कोल्हापुरात जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न
By संदीप आडनाईक | Published: May 10, 2024 06:50 PM2024-05-10T18:50:06+5:302024-05-10T18:52:32+5:30
तीस मुंनिंसह लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, प्रणामसागर, विशुद्धसागर महाराजांची उपस्थिती
कोल्हापूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठातील भगवान १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. या ६३ व्या वार्षिक पूजा महोत्सव सोहळ्याला परमपूज्य स्वामी लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, ज्योतिषाचार्य परमपूज्य प्रणामसागर महाराज आणि चर्याशिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य १०८ श्री विशुद्धसागर महाराज ससंघ (२९ पिंचि) यांच्यासह ३० महामुनींचा संघ उपस्थित होता.
केसापुर जैन मंदिराच्या महामस्तकाभिषेक समितीने या पूजेचे यशस्वी नियोजन केले. मांगलिक कार्यक्रमांना सकाळपासून सुरुवात झाली. सकाळी ६.०० वाजता मंगल वाद्यघोष, ध्वजारोहण, ८.३० वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर अभिषेक, श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक आणि षोडशोपचार पुजा, दुपारी २.०० वाजता आचार्यश्रींचे प्रवचन झाले. या सोहळ्यात भरतेश शांतीनाथ सांगरुळकर आणि कारभारी धनंजय भूपाल मगदूम या दाम्पत्याचा आदर्श दाम्पत्य म्हणून सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ४.०० वाजता सुरू झालेल्या या भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता सूर्यास्ताला झाली. यामध्ये पंचामृत, प्रथम कलश, नारळपाणी, इक्षुरस, आमरस, दुग्धाभिषेक, सर्वोषधि, कल्कचूर्ण, कषायचूर्ण, श्वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, पूर्ण सुगंधित कलाभिषेक असे परंपरेनुसार शांतीधारा, ईशान्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य असे चतुषकोन कलशाने अभिषेक करण्यात आले. मंगल आरती, पुष्पवृष्टी आणि रत्नवृष्टीने या सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी सुरेश मगदूम, नेमिनाथ कापसे, संजय आडके, संजय कापसे, संजय कोठावळे, अशोक रोटे, अनघा सांगरुळकर, ज्योती शेट्टी, पद्मा घोडके, रूपाली पत्रावळे, संमती हंजे, राजेश उपाध्ये यांच्यासह महा मस्तकाभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू राज्यातून कोल्हापूरसह सांगली, सातारा , रायबाग, बेळगाव, जिनकंची या मठातून सुमारे तीन हजार जैन श्रावक आणि श्राविका उपस्थित होते.