Mahaparinirvan Din 2022: कोल्हापुरातील शिर्के परिवाराने जपल्या भीमरायाच्या अस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:51 PM2022-12-06T15:51:15+5:302022-12-06T15:51:53+5:30

रक्षा विसर्जनानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब यांनी डॉक्टरांची रक्षा असलेले पात्र दादासाहेबांकडे सुपूर्द केले.

Mahaparinirvan Din 2022: Dr. Babasaheb Ambedkar bones preserved by Shirke family of Kolhapur | Mahaparinirvan Din 2022: कोल्हापुरातील शिर्के परिवाराने जपल्या भीमरायाच्या अस्थी

Mahaparinirvan Din 2022: कोल्हापुरातील शिर्के परिवाराने जपल्या भीमरायाच्या अस्थी

Next

संदीप आडनाईक

कोल्हापूर : महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांचा महासागर लोटतो. कोल्हापुरातील शिर्के परिवार मात्र मुंबईत न जाता आपल्या निवासस्थानीच जपून ठेवलेल्या भीमरायाच्या अस्थींचे पूजन करतात. यंदा चैत्यभूमीवर जाता न येणाऱ्यांसाठी हे रक्षापात्र शिर्के परिवाराने आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या घरातच दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. दुसऱ्या दिवशी मुंबईत चैत्यभूमीवर बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले. डॉक्टरांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत माजी आमदार दलितमित्र दादासाहेब मल्हारराव शिर्के यांच्यासह देशभरातून आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते चैत्यभूमीत गेले. रक्षा विसर्जनानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब यांनी डॉक्टरांची रक्षा असलेले पात्र दादासाहेबांकडे सुपूर्द केले.

परत आल्यानंतर २३ डिसेंबर १९५६ रोजी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत दादासाहेबांनी कोल्हापुरातून त्याची मिरवणूक काढली. चांदीचे राजहंस तयार करून त्याच्या पोटात दादासाहेबांनी या अस्थी जपून ठेवल्या आणि खास पेटीही तयार करवून घेतली.

शिर्के परिवाराकडून अस्थींचे पूजन

डिसेंबर १९८६ मध्ये दादासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र वसंतराव शिर्के यांनी सिद्धार्थनगर येथील निवासस्थानी हे रक्षापात्र जपून ठेवले. एप्रिल १९९७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी वसुधा तसेच अलका, सविता, राणी, पुष्पा आणि मल्हार ही पाच भावंडे या अस्थींचे पूजन करतात, ते आजतागायत सुरू आहे.

सिद्धार्थनगरातील घरी दर्शनासाठी उपलब्ध

यंदा प्रत्यक्ष चैत्यभूमीवर जाता येणार नसणाऱ्या अनुयायांसाठी शिर्के परिवाराने डॉक्टरांच्या अस्थींचे हे रक्षापात्र आज, मंगळवारी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. बाबासाहेबांच्या या रक्षा कलशाला ज्यांना अभिवादन करायचे आहे, त्यांनी सिद्धार्थनगरातील बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्के यांच्या राहत्या घरी हे कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव व माजी आमदार, दलितमित्र दादासाहेब शिर्के यांचे नातू मल्हार शिर्के यांनी दिली आहे.

Web Title: Mahaparinirvan Din 2022: Dr. Babasaheb Ambedkar bones preserved by Shirke family of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.