महापुराचा ‘गोकुळ’ला ४ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:13+5:302021-07-28T04:25:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे ‘गोकुळ’ दूध संघाला ४ कोटींचा फटका बसला आहे. पाच दिवसांत १६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे ‘गोकुळ’ दूध संघाला ४ कोटींचा फटका बसला आहे. पाच दिवसांत १६ लाख ४२ हजार लिटर दूध संकलन कमी झाले, तर २० लाख ८८ हजार लिटर दूध विक्री होऊ शकलेली नाही. त्याचबरोबर दूध उत्पादकांचे ६ कोटी १६ लाखांचे नुकसान झाले आहे.
महापुरामुळे २२ ते २६ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत ‘गोकुळ’च्या संकलनावर मोठा परिणाम झाला. पुरामुळे दूध वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाल्याने दूध उत्पादकांच्या घरातच राहिले. साधारणत: ७ लाख ५३ हजार लिटर म्हैस दूध तर ८ लाख ८९ हजार गाय दूध असे १६ लाख ४२ हजार लिटर दूध संकलन होऊ शकले नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना ६ कोटी १६ लाखांचा फटका बसला आहे. त्याचबरोबर संकलन कमी आणि राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने मुंबई, पुण्यासह इतर शहरांत जाणाऱ्या दुधाची वाहतूक ठप्प होती. परिणामी २० लाख ८८ हजार लिटर दुधाची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे ‘गोकुळ’ला ४ कोटींचा फटका बसला आहे.
दूध उत्पादकांनी विमा उतरवावा
जनावरांच्या औषधोपचारासाठी संघाच्या दहा डॉक्टरांचे पथक तयार असून, पुरानंतर रोगराई पसरू नये, म्हणून पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे. दूध उत्पादकांनी संघाची किसान विमा पॉलिसी करावी, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट-महापुरामुळे दूध उत्पादकांसह ‘गोकुळ’ला कोट्यवधींचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने उत्पादकांसह संघाला मदत करावी.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, ‘गोकुळ’)
असा बसला फटका
संकलन कमी - १६.४२ लाख लिटर
म्हैस दूध - ७.५३ लाख लिटर
गाय दूध - ८.८९ लाख लिटर
विक्रीत घट - २०.८८ लाख लिटर