जिल्ह्यातील १७ गावांत धावणार महारेशीम रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:22 PM2021-02-09T18:22:52+5:302021-02-09T18:24:46+5:30
collector Kolhapur- रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान घेण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १७ गावात प्रबोधनाचा रथ धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रथाला हिरवा बावटा दाखवून अभियानाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.
कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान घेण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १७ गावात प्रबोधनाचा रथ धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रथाला हिरवा बावटा दाखवून अभियानाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे, प्रकल्प अधिकारी बी.एम. खंडागळे, जिल्हा मनरेगा समन्वयक संजय पवार, तांत्रिक सहाय्यक तानाजी शिर्के, वाय.ए. पाटील, शेतकरी तानाजी पाटील उपस्थितीत हा अभियान उद्घाटन सोहळा झाला.
आजपासून सात दिवस हा रथ जिल्ह्यातील १७ गावातून धावणार आहे. गडहिग्लज, करवीर, हातकणंंगले असे तीन समूह तयार केले आहेत. प्रत्येक समुहात पाच ते सहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.
गडहिंग्लज समूहांतर्गत सरोळी, कुमरी, कानडेवाडी, कळीवडे, मुरकुटेवाडी, करवीर समुहांतर्गत म्हाळुंगी, कोतोली, पुनाळ, राधानगरी, कोथळी, पणोरी व हातकणंगले समुहातंर्गत यळगुड, लक्ष्मीवाडी, वाळवे खुर्द, सोनाळी, तळसंदे, व्हनाळी या गावात फिरवण्यात येणार आहे.
ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच लाभ
हा रथ जाणाऱ्या मार्गावर जागेवरच ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रांसह नोंदणी करावी. अभियान कालावधीत नोंदणी करणाऱ्यानाच २०२१-२२या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेंतर्गत शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. यासाठी समूहनिहाय, ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला आहे.