Maharashtra Assembly Election 2019 : शहरात सायकलवरून मतदान जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:21 PM2019-10-18T13:21:28+5:302019-10-18T13:23:21+5:30

महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

 Maharashtra Assembly Election 2019: Voting awareness rally from bicycles in the city | Maharashtra Assembly Election 2019 : शहरात सायकलवरून मतदान जनजागृती रॅली

सायकलवरून मतदान जनजागृती करताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह महानगरपालिका, जिल्हा प्रशासनातील कर्मचारी.

Next
ठळक मुद्देशहरात सायकलवरून मतदान जनजागृती रॅलीमतदारांना मतदान करण्याचेआवाहन

कोल्हापूर : महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, तुषार ठोंबरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर कोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था व नागरिकांना मतदानाबाबत प्रतिज्ञा दिली.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता नि:स्वार्थीपणे मतदान करावे. नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्यास प्रवृत्त करावे. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानादिवशी दिव्यांग बांधवांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये यावेळी उच्चांकी मतदान होईल.

यानंतर शहरातून सायकलने रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांचे मतदान राज्य निर्माणातील योगदान, मतदानासाठी वेळ काढा - आपली जबाबदारी पार पाडा, मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो, सर्वांची आहे जबाबदारी - मत देणार सर्व नर-नारी, माझे मत - माझा अधिकार असे फलक लावण्यात आले होते.

गांधी मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक अशी रॅली काढण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, ग्रंथपाल रत्नाकर जाधव, विजय वणकुद्रे यांच्यासह दत्ताजीराव माने शाळा, कोल्हापूर हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, आयुक्त, सीईओंचा सेल्फी

महापालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सेल्फी घेतला. चार मतदान जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांचेही उद्घाटन करण्यात आले.
 

 

Web Title:  Maharashtra Assembly Election 2019: Voting awareness rally from bicycles in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.