'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:26 AM2024-11-12T10:26:49+5:302024-11-12T10:29:43+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या प्रचारात भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत की, भाजप पुरस्कृत? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.
चंदगड : चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी दोन्ही बाजूला बंडखोरी झाली आहे. महायुतीमध्ये भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. हे दोघेही बंडखोर सध्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या प्रचारात भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत की, भाजप पुरस्कृत? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.
राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. शिवाजी पाटील यांच्याही प्रचाराला वेग आला आहे. गावो-गावी जाऊन मतदारांची भेट घेत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शिवाजी पाटील यांचे बॅनर्स लागले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गासह मतदारसंघातील अनेक भागात शिवाजी पाटील यांच्या प्रचाराचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर भाजपचे नेते आणि राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचे फोटो लागले आहेत. तसेच, गावो-गावी जाणाऱ्या प्रचार टेम्पोवरही असे बॅनर्स लावले आहेत.
दरम्यान, विद्यमान आमदार राजेश पाटील यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपचे शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते शिवाजी पाटील यांच्याबरोबरच आहेत. तसेच, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनीही शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्यने याठिकाणी मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अजित पवार समर्थक आमदार राजेश पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आता शिवाजी पाटील यांच्या प्रचारात अनेक ठिकाणी जे बॅनर्स लागले आहेत. त्यावरून शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत की, भाजप पुरस्कृत? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असून याविषयी राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.