कोल्हापुरात तपासणी पथकांकडून १० कोटींचा मुद्देमाल जप्त; रोकड किती.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:17 PM2024-11-12T14:17:12+5:302024-11-12T14:17:55+5:30
कोल्हापुरात सर्वाधिक मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर : आचारसंहिता सुरू झाल्यापासून जिल्ह्यात तपासणी पथकांनी अमली पदार्थ, संशयास्पद वस्तू, बेहिशेबी रोकड, कागदपत्रे उपलब्ध नसलेले दागिने असा १० कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ५ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. इचलकरंजी मतदारसंघात सर्वांत कमी १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांच्या हाती लागला.
निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू, अमली पदार्थ, वस्तू, जेवणावळी, रोकड देण्याचे आमिष दाखवले जाते. यातून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, महसूल, वन विभाग यांच्याकडून जिल्ह्यात एकूण १२८ स्थिर निरीक्षण पथके कार्यरत आहेत. याशिवाय भरारी पथकांकडूनही संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवली जात आहे. १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात तपासणी पथकांनी १० कोटी ७१ लाखांचा संशयास्पद मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
या वस्तू जप्त
- मौल्यवान दागिने- ७ कोटी ७३ लाख ४२ हजार
- अवैध दारू-१ कोटी ५० लाख ६२ हजार
- रोकड- २६ लाख २५ हजार
- अमली पदार्थ - ९० हजार
- इतर वस्तू - १ कोटी १९ लाख ८३ हजार
मतदार संघांमधील जप्त मुद्देमाल
- कोल्हापूर उत्तर - ५ कोटी ८६ लाख ८७ हजार
- हातकणंगले- २ कोटी ३७ लाख ३९ हजार
- कोल्हापूर दक्षिण- ६० लाख ४३ हजार
- कागल - ४४ लाख ४७ हजार
- करवीर - ३८ लाख ४८ हजार
- चंदगड - ३१ लाख ४० हजार
- शिरोळ- ३१ लाख ३ हजार
- राधानगरी- १६ लाख ८३ हजार
- शाहूवाडी- १३ लाख ५८ हजार
- इचलकरंजी- १० लाख ५५ हजार