एकदाच आमदार...कुठे गेले वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यात 'यांना' मिळाली एकदाच आमदारकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:52 PM2024-11-01T15:52:39+5:302024-11-01T15:53:51+5:30

कोल्हापूर : राजकारणात पद, प्रतिष्ठा व वलय असल्याने एकदा राजकीय हवा लागली की सहजासहजी माणूस त्या हवेपासून दूर जात ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 16 people got MLA once In Kolhapur district | एकदाच आमदार...कुठे गेले वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यात 'यांना' मिळाली एकदाच आमदारकी

एकदाच आमदार...कुठे गेले वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यात 'यांना' मिळाली एकदाच आमदारकी

कोल्हापूर : राजकारणात पद, प्रतिष्ठा व वलय असल्याने एकदा राजकीय हवा लागली की सहजासहजी माणूस त्या हवेपासून दूर जात नाही. सातत्याने यशाची अपेक्षा ठेवणारा नेता आपल्या पुढच्या पिढीचीही सोय लावण्यासाठी धडपडत असतो. घरात एकदा आमदारकी मिळाली की पुढच्या पिढ्यांनाही जनतेने स्वीकारावे अशी अपेक्षा ठेवणारे नेते असंख्य आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १६ जणांना एकदाच आमदारकी मिळाली आहे. यातील काहीजणांनी पुढे निवडणूक लढविली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एकदाच आमदारकीची संधी मिळालेल्या नेत्यांचे काही वारसदार पूर्वजांचा वारसा सांगत राजकारणात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काहीजण राजकीय पटलावरून कायमचे बाहेर गेले आहेत.

राधानगरीत कडव, भोईटे, शंकर धोंडी यांना एकदाच आमदारकी

राधानगरी मतदारसंघातून हरिभाऊ कडव १९८० मध्ये विधानसभेवर गेले होते. त्यांच्या माघारी मुलगा ॲड. संग्राम कडव यांनी राजकारणाऐवजी वकिली व्यवसाय निवडला. १९९५ मध्ये याच मतदारसंघातून नामदेवराव भोईटे आमदार झाले होते. त्यांचे चिरंजीव उमेश भोईटे हे वारके येथील हुतात्मा स्वामी सूतगिरणीचे अध्यक्ष, दुसरा मुलगा महेश हे पालकरवाडीचे सरपंच आहेत. याच मतदारसंघातून १९७२ मध्ये किसनराव मोरे अपक्ष विजयी झाले होते. त्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय आहे. १९९० मध्ये शंकर धोंडी पाटील यांनी जनता दलाकडून गुलाल उधळला होता. त्यांचे चिरंजीव वसंतराव पाटील राधानगरी शेतकरी संघाचे संचालक आहेत. १९६२ मध्ये ज्ञानदेव खांडेकर यांनाही एकदाच आमदारकी मिळाली.

देसाई, पाटील यांचे वारसदार अलिप्त

चंदगडमध्ये १९७२ च्या निवडणुकीत वसंतराव देसाई व १९७८ च्या निवडणुकीत विठ्ठलराव भैरू पाटील यांनी विजय मिळविला होता. या दोघांचेही वारस राजकारणात सक्रिय नाहीत. १९९५ च्या निवडणुकीत भरमू पाटील यांनाही एकदाच आमदारकी मिळाली. गडहिंग्लज मतदारसंघाचे पहिले आमदार महादेव श्रेष्टी यांचे वारसदार राजकीय पटलावरून दूर आहेत, तर १९६२ ला आमदारकी मिळालेले अप्पासाहेब नलवडे यांचे चिरंजीव संग्रामसिंह हेही तितकेसे सक्रिय नाहीत. १९६७ मध्ये तुकाराम कोलेकर यांनी विजय मिळविला होता. त्यांचे चिरंजीव हेमंत कोलेकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

यांना मिळाली एकदाच आमदारकी

  • राधानगरी : हरिभाऊ कडव, नामदेवराव भोईटे, दिनकरराव जाधव, किसनराव मोरे, ज्ञानदेव खांडेकर, दिनकरराव जाधव.
  • चंदगड-गडहिंग्लज : वसंतराव देसाई, विठ्ठल पाटील, महादेव श्रेष्टी, अप्पासाहेब नलवडे, तुकाराम कोलेकर, भरमू पाटील. बी. एस. पाटील.
  • इचलकरंजी-हातकणंगले-वडगाव : के. एल. मलाबादे, एस. पी. पाटील, बी. बी. खंजिरे. नानासाहेब माने, नामदेव व्हटकर,
  • शिरोळ : दिनकरराव यादव, सरोजिनी खंजिरे
  • पन्हाळा-शाहूवाडी: एस. डी. पाटील, आर. डी. पाटील.
  • सांगरूळ-करवीर : दिनकरराव मुद्राळे, आर. बी. पाटील.
  • कोल्हापूर : लालासाहेब यादव, रवींद्र सबनीस, एन. डी. पाटील, दिलीप देसाई, चंद्रकांत जाधव.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 16 people got MLA once In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.