कोल्हापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघांत १८६ तृतीयपंथी मतदार; सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:25 PM2024-11-15T16:25:48+5:302024-11-15T16:26:37+5:30
मतदान केंद्रावर यंदा दिव्यांग, ज्येष्ठांसाठीही स्वतंत्र रांग
कोल्हापूर : मतदान केंद्रावर महिला आणि पुरुष अशा दोन स्वतंत्र रांगा असतात. यंदा दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठीही स्वतंत्र रांग असेल. परंतु, तृतीयपंथी मतदार कोणत्या रांगेत उभा राहणार, यावर निवडणूक विभागाने त्यांना थेट प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय या मतदाराचा सत्कारही करण्यात येणार आहे.
सर्वाधिक तृतीयपंथी मतदार या मतदारसंघात
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८६ तृतीयपंथीय मतदार आहेत. यापैकी इचलकरंजी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६२ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर दक्षिणमध्ये ५१ मतदार आहेत.
१० मतदारसंघांत १८६ तृतीयपंथी मतदार
मतदारसंघ - संख्या
इचलकरंजी - ६२
कोल्हापूर दक्षिण - ५१
हातकणंगले - २०
कोल्हापूर उत्तर - १८
राधानगरी - १२
चंदगड - ०९
शाहूवाडी - ०७
कागल - ०५
शिरोळ - ०२
करवीर - ००
तृतीयपंथी नावनोंदणीत उदासीन का?
अनेक वर्षांपासून तृतीयपंथी या उपेक्षित घटकाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन चेष्टेचा राहिला आहे. त्यामुळे अनेकजण मतदान करणे टाळत. मतदानासाठी गेलेच तर हेटाळणी होते, सामान्य रांगेत खूपवेळ थांबवून ठेवले जाई. चेष्टा करणे, हिणवले गेल्याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे कोल्हापुरातील मैत्री संघटनेच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर थेट प्रवेश देण्याची मागणी केली. त्याला आयोगाने मान्यता दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी सांगितले.
लोकसभेत ४४ जणांनी केले मतदान
लोकसभेला जिल्ह्यातील दोन मतदारसंघात ४४ तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. कोल्हापूर मतदारसंघात २१.५ तर हातकणंगले मतदारसंघात २६.८७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
नावनोंदणीत ‘इतर’ असा पर्याय; रांगा दोनच का?
तृतीयपंथीयांच्या मागणीनुसार न्यायालयानेही त्यांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंद घेतली. त्यामुळे मतदार नोंदणीतही त्यांच्यासाठी ‘इतर’ असा स्वतंत्र पर्याय ठेवला. तरीही कागदपत्रांच्या अभावामुळे अनेकांची नोंदणी झालेली नाही. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुरुष आणि स्त्री मतदार अशा दोनच रांगा होत्या. परंतु, यंदा ज्येष्ठ, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश दिलेले आहेत.
तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रावर प्रवेश देण्याबरोबरच त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तशाप्रकारचे निर्देश सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत. तृतीयपंथीयांना मतदान करण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता निवडणूक विभाग घेत आहे. -समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर.