शासकीय अधिकारी असल्याचे भासवले, कोल्हापुरात बोगस निवडणूक तपासणी पथकाने २५ लाख लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:24 PM2024-11-13T15:24:53+5:302024-11-13T15:25:32+5:30

पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेत आहेत

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 25 lakhs was distributed by the bogus election investigation team in Kolhapur | शासकीय अधिकारी असल्याचे भासवले, कोल्हापुरात बोगस निवडणूक तपासणी पथकाने २५ लाख लांबविले

संग्रहित छाया

गांधीनगर/कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून बोगस पथकाने एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लांबविली. हा प्रकार मंगळवारी (दि. १२) पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला. याबाबत व्यापारी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी सुभाष हारणे हे यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते सोमवारी झालेल्या व्यवसायाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारमधून तावडे हॉटेल येथे आले. दरम्यान, २५ ते ३० वयोगटातील अज्ञात पाच जणांनी हारणे यांची कार अडवली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू आहे. आमचे अधिकारी तुमच्या कारची झडती घेतील, असे सांगून त्यांनी कारची झडती सुरू केली. त्यावेळी २५ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी कारवाईची भीती घातली. त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. तिथे त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल काढून घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात हारणे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

बोगस पथकाने खळबळ

बोगस तपासणी पथकाने व्यावसायिकाची लूट केल्याची माहिती मिळताच पोलिस आणि शासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना तपासाच्या सूचना दिल्या. गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पाच पथके तपासासाठी रवाना झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

महामार्गापलीकडेच अधिकृत पथक

निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके कार्यरत आहेत. या ठिकाणी २४ तास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतात. तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे. तिथून महामार्गाच्या पलीकडेच तोतया पथकाने लूट केली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 25 lakhs was distributed by the bogus election investigation team in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.