कोल्हापूर जिल्ह्यात ६३ अपक्षांचा 'नेम'; कोणाचा होणार 'गेम' ?, आतापर्यंत पाच अपक्षांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:27 PM2024-11-14T16:27:12+5:302024-11-14T16:27:23+5:30
‘चंदगड’, ‘राधानगरी’मध्ये अपक्ष ठरले डोकेदुखी
कोल्हापूर : विधानसभेच्या १९९९ ते २०२४ पर्यंतच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक ६३ अपक्ष नशीब अजमावत आहेत. हे अपक्ष कोणाचे गणित बिघडवणार, हे निकालानंतरच समजणार असले तरी गेल्या पंचवीस वर्षांत जिल्ह्यात केवळ पाच अपक्षांनीच मैदान मारले आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान आठवड्यावर आले आहे. प्रचारात चांगलीच रंगत आली असून काही मतदारसंघांत अपक्षांनी पक्षांच्या उमेदवारांच्या नाकात दम आणला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वाधिक ६३ अपक्ष यंदा रिंगणात आहेत. काही ठिकाणी तुल्यबळ अपक्ष नसले तरी ‘चंदगड’, ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ येथे अपक्ष पक्षीय उमेदवारांची डोकेदुखी ठरली आहे. इतर ठिकाणी अपक्ष असले तरी पक्षाच्या उमेदवाराला फारसे मारक ठरतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.
पाच अपक्षांनाच संधी
विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत तब्बल तीन अपक्षांना यश मिळाले. ‘शिरोळ’मधून राजू शेट्टी, ‘राधानगरी’तून के. पी. पाटील तर ‘करवीर’ मधून सतेज पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या दोन निवडणुकींत कोल्हापूरकरांनी अपक्षांना संधी दिली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’तून प्रकाश आवाडे तर ‘शिरोळ’मधून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना यश मिळाले.
डिपॉझिट जप्त तरीही निवडणुकीची हौस
राजकीय ताकद नसणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतात, पण निवडणूक लढवण्याची हौस काही थांबत नाही. काहींना तर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल करायचाच याची हौस असते.
गेल्या पंचवीस वर्षांत असे राहिले अपक्ष रिंगणात
निवडणूक - अपक्ष उमेदवार
१९९९ - २०
२००४ - २३
२००९ - ४७
२०१४ - ३९
२०१९ - ५२
२०२४ - ६३