कोल्हापुरात मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर वातावरण तापले, गारगोटीत सतेज पाटील-शाहू छत्रपती एका व्यासपीठावर आले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:30 PM2024-11-04T19:30:32+5:302024-11-04T19:34:53+5:30
शिवाजी सावंत गारगोटी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्या धक्कादायक माघारीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज ...
शिवाजी सावंत
गारगोटी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्या धक्कादायक माघारीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील व खासदार शाहू छत्रपती हे गारगोटी येथील कार्यक्रमाला येतात की नाही अशी उपस्थितांना चिंता लागली होती. दुपारपासून कार्यक्रमाचे संयोजक आणि कार्यकर्ते त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.
गारगोटी येथे राहुल देसाई यांच्या घरवापासीच्या कार्यक्रमासाठी ते प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने सर्वांना उत्सुकता होती. अन् संध्याकाळी खासदार शाहू छत्रपती अन् आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाला तब्बल तीन तास उशिरा झाला.
सुरवातीला खासदार शाहू छत्रपती आले. त्यानंतर थोड्यावेळाने आमदार सतेज पाटील आल्यानंतर शाहू छत्रपती यांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत करून हस्तांदोलन केले. यानंतर दोघांमध्ये एकमेकांशी संवाद सुरु होता. मधुरिमाराजेंच्या माघारीच्या घडामोडींच्या घटनेचा कोणताही लवलेश दोघांचाही चेहऱ्यावर दिसत नव्हता. यामुळे आमदार सतेज पाटील यांची राजकीय परिपक्वता तर खासदार शाहू छत्रपती यांची सहृदयता दिसून आली. राजकारणात कोणत्याही प्रसंगाकडे कसे पहावे याचे मूर्तिमंत उदाहरण आज गारगोटी येथे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी अनुभवले