मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव

By समीर देशपांडे | Published: October 28, 2024 01:10 PM2024-10-28T13:10:55+5:302024-10-28T13:13:02+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवारी

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Allies restrict Bharatiya Janata Party from increasing its strength in Kolhapur | मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव

मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव

समीर देशपांडे

कोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्या २० वर्षांत शिवसेना आणि जनसुराज्य या मित्रपक्षांमुळे भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. २०१४ साली आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे दोन आमदार निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची संख्या २०१९ साली शून्यावर आली हे वास्तव आहे.

कोल्हापूर शहर, इचलकरंजी, मलकापूर, आजरा अशी भाजपची ताकद असलेली जिल्ह्यातील काही केंद्रे पहिल्यापासून होती. केवळ छोट्या आंदोलनांच्या माध्यमातून सुभाष वोरा, बाबा देसाई, नाना जरग, बाबूराव कुंभार यांच्यासारख्या अनेकांनी पक्ष जिवंत ठेवला होता. अशातच भाजपआधी कॉंग्रेसला अंगावर घेत शिवसेना जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाली आणि स्थिरावली. ही किमया भाजपला साधता आली नाही.

एकीकडे १९९० पासून शिवसेना अस्तित्व दाखवत असताना, भाजपच्या चिन्हावर १९९९ साली करवीर मतदारसंघातून संग्रामसिंह गायकवाड यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. २००९ साली सुरेश हाळवणकर यांच्या रूपाने जिल्ह्यात पहिल्यांदा इचलकरंजीत कमळ फुलले. त्यावेळी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर दक्षिणमधून भाजपतर्फे, तर धनंजय महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात होते.

२०१४ साली भाजपने आपली सर्वोच्च दोन आमदारांची संख्या नोंदवली. हाळवणकर पुन्हा इचलकरंजीतून विजयी झाले, तर अमल महाडिक हे १४ दिवसांत कोल्हापूर दक्षिणमधून आमदार झाले. परंतु, यावेळी कोल्हापूर उत्तरमधून महेश जाधव आणि कागलमधून रिंगणात उतरलेले परशुराम तावरे पराभूत झाले. २०१९ साली हाळवणकर आणि महाडिक दोघेही पराभूत झाले आणि भाजप शून्यावर आला. विधानसभेच्या दहा मतदारसंघांपैकी भाजपला गेल्या १५ वर्षांत केवळ चारच मतदारसंघांत लढण्याची संधी मिळाली आहे.

चंदगड, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, हातकणंगले हे मतदारसंघ परंपरेने शिवसेना आणि जनसुराज्यकडे असल्याने या ठिकाणी भाजपला फारशी कधीच संधी मिळाली नाही. आता तर शिंदेसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन मित्रपक्षांच्या गर्दीत भाजपच्या कमळावर निवडणूक लढवण्यासाठीच मर्यादा आल्या आहेत. जोपर्यंत सर्वजण स्वतंत्र लढत नाहीत तोपर्यंत भाजपची अशीच स्थिती राहणार आहे.

बळ वाढले पण..

भाजप नेते चंद्रकांत पाटील हे २०१४ च्या सरकारमध्ये मातब्बर खात्यांचे मंत्री होते. त्यांनी अनेकांना बळ दिले. परंतु, वाटणीला मतदारसंघच कमी असल्याने युतीच्या विजयासाठीच त्यांची ताकद खर्ची पडली. त्यानंतर धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार झाले आणि ताकद आणखी वाढली. परंतु, मतदारसंघ तितकेच राहिले. त्यामुळेच आता काही मतदारसंघ खेचण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. परंतु, एकीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दुसरीकडे विनय कोरे त्यांना हलू देत नाहीत, ही सध्याची स्थिती आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Allies restrict Bharatiya Janata Party from increasing its strength in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.