Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:10 PM2024-11-19T12:10:04+5:302024-11-19T12:10:32+5:30

पथकांची नजर हालचालींवर

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Campaigning for Assembly in Kolhapur district is over | Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

कोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेला शब्दांचा जाहीर खेळ सोमवारी संध्याकाळी संपला आणि लगोलग आकड्यांचा खेळ सुरू झाला. कुठल्या भागात किती मते पडतील, अशा आकड्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उमेदवारांनी दुचाकी रॅली आणि पदयात्रेने जाहीर प्रचाराची सांगता केली. जाहीर सभांच्या माध्यमातून एकमेकांचा पंचनामा करणाऱ्या नेत्यांची राखीव फौज आता छुप्या प्रचारात उतरली असून, ज्या भागात कमी मतांची शंका आहे, तेथील खड्डा भरण्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी एक हजार दुचाकीधारकांसोबत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. तर कसबा बावडा येथे रॅलीचा समारोप केला. विरोधी उमेदवार राजेश लाटकर यांनी भागात पदयात्रा काढल्या. कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी सांगता सभा घेतल्या. मुश्रीफ यांच्या सभेसाठी खासदार धैर्यशील माने आणि अंबरीश घाटगे यांची उपस्थिती होती. तर घाटगे यांच्या सभेत शरद पवार यांच्या भगिनी आणि एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी चौफेर टीका केली.

आमदार विनय कोरे यांनी जोतिबा येथे सभा घेत प्रचाराची सांगता केली. सत्यजित पाटील यांनी मलकापुरात पदयात्रा काढली. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आलास येथे सांगता सभा झाली तर गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूरमध्ये पदयात्रा काढली. स्वाभिमानीनेही जयसिंगपूरमध्ये जाहीर सभा घेतली. प्रकाश आबिटकर यांनी आजऱ्यात दुचाकी रॅली काढली तर के. पी. पाटील यांनी राशिवडेमध्ये पदयात्रा काढली. अन्य चंदगड, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर मतदारसंघातील उमेदवारांनी मोठ्या गावांमध्ये पदयात्रा आणि दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली.

कार्यकर्त्यांना मदत

जाहीर प्रचार संपताच उमेदवार व त्यांच्या प्रमुख कारभाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांतील प्रचाराचा आढावा घेतला, कोठे कमी आहोत, कोणाला संपर्क करावा लागणार आहे याचा अंदाज घेऊन सोमवारी रात्रीनंतर जोडण्या सुरू झाल्या. मतदान केंद्रनिहाय लावल्या जाणाऱ्या बूथवरील कार्यकर्त्यांना साहित्य पाठविण्याचे नियोजन सुरू झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही कार्यकर्ते मतदारसंघात रात्री अपरात्री फिरत असून उमेदवारांचे निरोप पोहोचवीत आहेत.

पास वाटप

निवडणुकीच्या धावपळीत प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांचे श्रमपरिहार होत आहेत. काही मतदारांपर्यंत जेवणाचे पास वाटले जात आहेत. त्यामुळे हॉटेल्स, धाबे, कार्यालयातील जेवणावळीची गर्दी झालेले चित्र आहे. हॉटेल, धाब्यावरील गर्दी दिसत असली तरी ते कोणाकडून आले आहेत हे स्पष्ट होत नसल्याने यंत्रणेचाही नाइलाज होत आहे. परंतु रात्री साडेदहा वाजता सर्व व्यवहार बंद केले जात आहेत.

पथकांची नजर हालचालींवर

निवडणुकीसाठी नेमलेली सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. गस्ती पथकांची करडी नजर रात्रीच्या हालचालीवर आहे. ही पथके सोमवारपासून अधिक दक्ष झाली आहेत. या पथकांना काही फोन येत असल्याने त्यांचीही धावपळ होत आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Campaigning for Assembly in Kolhapur district is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.