क्षीरसागर निश्चिंत, महाडिक व्यस्त, कदम अस्वस्थ!; कोल्हापूर उत्तरमधील परिस्थिती चिघळायला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:58 PM2024-10-26T12:58:22+5:302024-10-26T13:02:44+5:30

क्षीरसागर यांना डावलल्यास प्रचार नाही

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Confusion due to role of Rajesh Kshirsagar, MP Dhananjay Mahadik, Satyajit Kadam in Kolhapur North Constituency | क्षीरसागर निश्चिंत, महाडिक व्यस्त, कदम अस्वस्थ!; कोल्हापूर उत्तरमधील परिस्थिती चिघळायला सुरुवात

क्षीरसागर निश्चिंत, महाडिक व्यस्त, कदम अस्वस्थ!; कोल्हापूर उत्तरमधील परिस्थिती चिघळायला सुरुवात

कोल्हापूर : विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना कोल्हापूर उत्तरचीमहायुतीमधीलच राजकीय परिस्थिती चिघळायला सुरुवात झाली आहे. राजेश क्षीरसागर निश्चिंत, खासदार धनंजय महाडिक चिरंजिवांच्या उमेदवारीसाठी व्यस्त आणि या सगळ्यांमुळे सत्यजित कदम अस्वस्थ असे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.

दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून क्षीरसागर शुक्रवारी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात येताच त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी निश्चित झाली म्हणून त्यांच्या ‘शिवालय’ या घरासमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परंतु तो आनंद फार तास राहिला नाही. तोपर्यंत उमेदवारी बदलाची हवा पुन्हा सुरू झाली. म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि उमेदवारी निश्चित असून सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.

परंतु परिस्थिती अस्थिर होऊ लागल्याने त्यांनाही संध्याकाळीच कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला. दुसरीकडे, खासदार महाडिक यांनी शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. ते पुन्हा संध्याकाळी कोल्हापुरात आले. याच दरम्यान सत्यजित कदम हे या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आज, शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.

त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून महायुतीमध्येच धुमशान सुरू असल्याचे दिसून येत आहे. २०२२ साली सत्यजित कदम यांनी उत्तरची पोटनिवडणूक् लढवली होती आणि ८० हजार मते घेतली होती. त्यामुळे ते उमेदवारीवर दावा करत आहेत. दुसरीकडे, क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सांगत आहेत. महाडिक शिंदे यांना भेटून येत आहेत. या सगळ्यामुळे महायुतीमध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण तयार होत आहे.

क्षीरसागर यांना डावलल्यास प्रचार नाही

क्षीरसागर यांनी शुक्रवारी सायंकाळी बुधवार पेठेत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकांनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या धावपळीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. गेल्यावेळच्या पराभवानंतरही ज्या पद्धतीने राजेश क्षीरसागर सातत्याने कार्यरत राहिले, मोठे प्रकल्प आणले, निधी आणला, तरीही त्यांची उमेदवारी हिसकावण्याचा प्रयत्न झाला तर अन्य कोणाचाही प्रचार करणार नाही, असा इशाराही या मेळाव्यात देण्यात आला.

दक्षिणवर परिणाम

अशा घडामोडींमुळे कोल्हापूर दक्षिणमध्येही परिणाम होऊ शकतो, असा अप्रत्यक्ष इशारा क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, या खणखणीत नाण्याला बाजूला करणं सोपं नाही. वास्तविक महाडिक हे सत्यजित कदम यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते; परंतु तिथे गेल्यावर त्यांनी कदम यांचे नावच घेतले नाही. त्यामुळे कदम यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Confusion due to role of Rajesh Kshirsagar, MP Dhananjay Mahadik, Satyajit Kadam in Kolhapur North Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.