कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत गुंता; करवीरच्या हट्टाने हातकणंगलेत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:18 PM2024-10-26T15:18:57+5:302024-10-26T15:20:34+5:30

जनसुराज्य कोड्यात

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversy in the Grand Alliance over candidature in Hatkanangle Assembly Constituency | कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत गुंता; करवीरच्या हट्टाने हातकणंगलेत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत गुंता; करवीरच्या हट्टाने हातकणंगलेत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

आयुब मुल्ला

खोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला. परंतु महायुतीतील संभ्रम वाढतच चालला आहे. शिंदेसेनेने मतांची बेरीज समोर ठेवून उमेदवारीचा हट्ट धरला आहे. शेवटच्या टप्प्यात गुंतागुंत वाढल्याने अखेर आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी अशोकराव माने यांना जाहीर केली. इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व माजी आमदार सुजित मिणचेकर यांची नावे शिंदेसेनेकडून पुढे आली आहेत. करवीरमध्ये कोरे यांनी जनसुराज्यचा उमेदवार उतरविल्याने शिंदेसेना हातकणंगलेसाठी आक्रमक झाल्याने महायुतीच्या एकीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

हातकणंगले मतदारसंघात अशोकराव माने यांनी जनसंपर्क ठेवल्याने तेच महायुतीचे उमेदवार असतील, असा होरा होता.परंतु गेल्या चार-पाच दिवसात महायुतीत नव्या घडामोडी सुरू झाल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाने ही जागा मिळविण्यासाठी जोर धरला असून अलका स्वामी यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जनसुराज्य व भाजपामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार कोरे यांच्यावर टाकली होती. त्यानुसार विजय मिळाला. तेव्हापासून कोरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुडबुकमध्ये समाविष्ट झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर कोरे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अशी स्थिती असताना उमेदवारीचा गुंता कसा काय तयार झाला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. करवीरमध्ये जनसुराज्यने संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. तेथे शिंदे गटाने चंद्रदीप नरके यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभेला मताधिक्य मिळाल्याने शिंदेसेना आग्रही

हातकणंगलेत विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेले मताधिक्य हे कारण पुढे करून शिंदे गट उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे अलका स्वामी यांचे उमेदवारीसाठी नाव पुढे करण्यात आले. त्यातच माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी महाविकासकडून उमेदवारी मिळणार नसल्याने शिंदे गटाशी संपर्क साधला आहे. गत निवडणुकीत त्यांना दोन नंबरची मते मिळवली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते का याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversy in the Grand Alliance over candidature in Hatkanangle Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.