इन्स्टावर ऋतुराज, सतेज पाटील यांची बदनामी; नऊ युजरवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:42 IST2024-11-05T18:42:05+5:302024-11-05T18:42:50+5:30
सायबर पोलिसांकडून तपास

इन्स्टावर ऋतुराज, सतेज पाटील यांची बदनामी; नऊ युजरवर गुन्हा
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवरून व्हायरल केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी इन्स्टाच्या नऊ युजर्सवर गुन्हा दाखल केला. याबाबत काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय विष्णू पोवार (वय ५५, रा. मार्केट यार्ड रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापताच सोशल मीडियातून बदनामीचे प्रकार सुरू झाले आहेत. विविध बनावट नावांनी सुरू असलेल्या इन्स्टा अकाऊंटवरून आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रकार लक्षात येताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित इस्टा अकाऊंट युजर्सविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार ९ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.