फोडाफोडीने विजयाची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न; पदयात्रा, गाठीभेटीवर भर

By राजाराम लोंढे | Published: November 7, 2024 03:35 PM2024-11-07T15:35:19+5:302024-11-07T15:35:51+5:30

तिरंगी, पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासान

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Efforts to create an air of victory in Kolhapur with the support of different parties, organizations and society | फोडाफोडीने विजयाची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न; पदयात्रा, गाठीभेटीवर भर

फोडाफोडीने विजयाची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न; पदयात्रा, गाठीभेटीवर भर

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत माघारीनंतर एकीकडे थंडीची चाहूल लागली असतानाच प्रचार मात्र तापू लागला आहे. मतदानासाठी अजून तेरा दिवस शिल्लक असले तरी फोडाफोडी, विविध पक्ष, संघटना, समाजाचा पाठिंबा घेऊन विजयाची हवा निर्माण करायची आणि ही हवा विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न दहाही मतदारसंघांत दिसत आहे.

विधानसभेच्या दहा मतदारसंघांत २०१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८० जणांनी सोमवारी माघार घेतल्यानंतर दहा जागांसाठी १२१ जण नशीब आजमावत आहेत. बहुतांशी ठिकाणी बंडोबांना थंड करताना राजकीय नेत्यांसह उमेदवारांची दमछाक झाल्याचे दिसले. कोल्हापूर उत्तरमध्ये तर नाट्यमयरीत्या काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतल्याने लढतीचे चित्रच बदलून गेले. महायुती व महाविकास आघाडीने प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.

दहा मतदारसंघांतील लढतीचे चित्र पाहिले तर एकाही ठिकाणी छातीठोकपणे कोणीही विजयाची खात्री देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेला जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीला समान संधी मिळाली. मात्र, लोकसभेला असणारे वातावरण आणि आताच्या वातावरणात कमालीचा फरक जाणवत आहे. प्रचारातील मुद्दे वेगळे आहेतच, त्याचबरोबर या निवडणुकीला स्थानिक प्रश्नांची किनार असल्याने विजयाची शंभर टक्के खात्री देणारे कमी उमेदवार आहेत.

फोडाफोडीचे राजकारणाने वेग घेतला आहे. विविध प्रकारची आमिष दाखवून छोटे-मोठे गट आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच मतदारसंघात चढाओढ पाहावयास मिळत आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना आणि समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी वेगळी यंत्रणा सक्रिय झाली असून रोज एक पक्षप्रवेश अथवा पाठिंबा मिळवून निवडणुकीत आपल्या बाजूने हवा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्यात होणारी हवा मतदानापर्यंत कायम राखून विजयावर स्वार होण्याची रणनीती प्रत्येकाची आहे.

तिरंगी, पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासान

दहापैकी पाच ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. त्याचबरोबर राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये तिरंगी तर ‘चंदगड’मध्ये पंचरंगी लढत होत आहे. तिरंगी व पंचरंगी लढतीच्या ठिकाणी घमासान सुरू झाले असून धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.

पदयात्रा, गाठीभेटीवरच भर

प्रचार प्रारंभाच्या सभा वगळता पदयात्रा, गाठीभेटी व बैठकांवरच सर्वच उमेदवारांचा भर आहे. उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गाव, वाड्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

परजिल्ह्यातील मतदारांचे नियोजन

कामानिमित्त परजिल्ह्यात मतदारांची मोठी संख्या आहे. पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील मतदार आहेत. विशेषता ‘शाहूवाडी’, ‘चंदगड’, ‘कागल’ या मतदारसंघात परजिल्ह्यात असलेल्या मतदारांची संख्या तुलनेत अधिक आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Efforts to create an air of victory in Kolhapur with the support of different parties, organizations and society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.