Vidhan Sabha Election 2024: शिरोळमध्ये काटाजोड सामना; यड्रावकर, गणपतराव, उल्हास पाटील यांचा कस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 04:53 PM2024-11-09T16:53:04+5:302024-11-09T16:53:38+5:30

संदीप बावचे जयसिंगपूर : शिरोळ मतदारसंघात माघारीनंतर दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुतीचे ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Rajendra Patil-Ydravkar, Ganpatrao Patil, Ulhas Patil in Shirol Constituency | Vidhan Sabha Election 2024: शिरोळमध्ये काटाजोड सामना; यड्रावकर, गणपतराव, उल्हास पाटील यांचा कस

Vidhan Sabha Election 2024: शिरोळमध्ये काटाजोड सामना; यड्रावकर, गणपतराव, उल्हास पाटील यांचा कस

संदीप बावचे

जयसिंगपूर : शिरोळ मतदारसंघात माघारीनंतर दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुतीचे राजेंद्र पाटील- यड्रावकर, महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांच्यात सरळ लढत होईल, असे चित्र असतानाच बंडखोरी करीत उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीत प्रवेश करून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मत विभागणीचा फायदा कोणाला होणार, यावरच गणिते अवलंबून राहणार आहेत.

यड्रावकर यांनी महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी घटक पक्षांची भूमिका होती. दलित, मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी यड्रावकर यांनी सुरुवातीपासूनच अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांची रणनीती यशस्वी ठरली. विकासकामांच्या शिदोरीवर यड्रावकर हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतांचे गणित कसे यशस्वी ठरते त्यावरच त्यांच्या विजयाची गणिते अबलंबून आहेत.

महाविकास आघाडीतून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्व. सा.रे. पाटील यांच्या कामाची पोचपावती मतदार कशी देतात, यावरच निवडणुकीतील यशाचे गणित अवलंबून असणार आहे. २०१४ ला स्वाभिमानीने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून उल्हास पाटील आमदार झाले. २०१९ ला त्यांचा पराभव झाला. उद्धवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने स्वाभिमानीतून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

प्रमुख तिरंगी लढत होत असली तरी बहुजन समाज पार्टीकडून दादासो मोहिते, रिपब्लिकन सेनेचे विश्वजित कांबळे, अपक्ष गजाला मुल्ला, जितेंद्र ठोंबरे, राहुल कांबळे, शीला हेगडे, शंकर बिराजदार आदी उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विकासकामांचा मुद्दा अधिक प्रभावी

राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी विकास हाच मुद्दा घेऊन प्रचाराचा रोख ठेवला आहे, तर गणपतराव पाटील यांनी सततचा भेडसावणारा महापूर, बेरोजगारी, पंचगंगा प्रदूषण प्राधान्याने सोडविण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. तालुक्यातील प्रश्न चळवळीमुळेच सुटू शकतात, हा मुद्दा घेऊन उल्हास पाटील मैदानात उतरले आहेत.

गड कोण जिंकणार

शिरोळसह जयसिंगपूर व कुरुंदवाड या तीन शहरांतील मते निर्णायक ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाची, तर महाविकास आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. स्वाभिमानीचे होम पिच असतानाही त्यांच्या मताधिक्यात घट झाली होती. महायुतीतून यड्रावकर यांना गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे, रामचंद्र डांगे, विजय भोजे,

महाविकास आघाडीतून गणपतराव पाटील यांना वैभव उगळे, मधुकर पाटील, चंगेजखान पठाण, तर उल्हास पाटील यांच्या पाठीशी माजी खासदार राजू शेट्टी यांची ताकद आहे. मत विभागणीचा फायदा कोणाला मिळणार, शिरोळचा गड कोण जिंकणार याचीच उत्सुकता आहे.

  • एकूण मतदार - ३,२९,१४१
  • पुरुष - १,६३,२५४
  • महिला - १,६५,८८५

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Rajendra Patil-Ydravkar, Ganpatrao Patil, Ulhas Patil in Shirol Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.