माझ्यासह कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी लढतोय, राजेश लाटकर यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:25 IST2024-11-05T13:25:01+5:302024-11-05T13:25:54+5:30
कोल्हापूर : काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ज्या पद्धतीने बदलण्यात आली, त्यातून माझी, कुटुंबाची व कार्यकर्त्यांची बदनामी झाली. म्हणूनच ...

माझ्यासह कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी लढतोय, राजेश लाटकर यांनी केले स्पष्ट
कोल्हापूर : काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ज्या पद्धतीने बदलण्यात आली, त्यातून माझी, कुटुंबाची व कार्यकर्त्यांची बदनामी झाली. म्हणूनच माझ्यासह कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढत आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला अथवा नेते आमदार सतेज पाटील यांना तोंडघशी पाडण्याचा प्रश्नच येत नाही, असे माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या मुदतीपर्यंत ‘नॉट रिचेबल’ असलेले लाटकर दुपारी चिन्ह वाटपावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना घडलेल्या घटनांची माहिती दिली.
काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली होती. सर्व प्रक्रियेतून पुढे गेल्यानंतर दि. २७ ऑक्टोबरला मला उमेदवारी जाहीर झाली; पण त्याच रात्रीपासून माझ्या नावाला विरोध व्हायला लागला. काही माजी नगरसेवकांनी आमचे नेते सतेज पाटील यांना सह्यांचे निवेदन देऊन उमेदवारी बदलाची मागणी केली. या निवेदनावर खोट्या सह्या होत्या. कोल्हापूर उत्तरशी काही संबंध नाही, अशा माजी नगरसेवकांच्या सह्या निवेदनावर होत्या. माझ्याबद्दल तक्रार होती तर पक्ष कार्यालयात बसून निरीक्षकांसमोर चर्चा व्हायला पाहिजे होती. मला थांबायला लागतंय असे सन्मानाने सांगितले असते तर मी आदेश मानून पुढे गेलो असतो. परंतु, परस्पर नाव बदलले गेले. त्यामुळे आत्मसन्मान दुखावला गेला, असे लाटकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची कळकळ..
मी काँग्रेस विचाराचा कार्यकर्ता आहे. पद आणि सत्तेसाठी नको त्या तडजोडी केल्या नाहीत. सतेज पाटील हे माझे नेते आहेत आणि भविष्यातही राहतील, असे सांगत ते म्हणाले, माझा खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यावर दोष नाही; पण मालोजीराजे यांनी एका कार्यकर्त्याची कळवळ ऐकून घ्यायला पाहिजे होती.
भेट टाळली..
मी अपक्ष लढतोय म्हटल्यावर विरोधी पक्षाकडून संपर्क होऊ लागला होता. तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुमची आमच्या नेत्यांबरोबर भेट घालून देतो, असे निरोप येत होते; पण मी क्षणिक कार्यकर्ता नसल्याने त्यांची भेट टाळली, असे लाटकर यांनी स्पष्ट केले.