शेती पंपांना चोवीस तास मोफत वीज देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:58 PM2024-11-06T16:58:11+5:302024-11-06T16:59:08+5:30
मविआ आल्यास सर्व योजना बंद करतील
कोल्हापूर : महायुती सरकार पुढील काळात राज्यात चौदा हजार मेगावॅट वीज सोलरमधून तयार करणार असल्याने शेती पंपांना चोवीस तास मोफत वीज पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील प्रचार सभेत बोलताना दिली.
महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम केले. सर्वसामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून सरकारने अनेक योजना राबविल्या. तुम्ही चिंता करू नका. या सर्व योजना पुढील काळातही आम्ही राबविणार आहोत, असे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार जर सत्तेवर आले तर या सर्व योजना बंद करतील अशी भीती व्यक्त केली. महाविकास आघाडीचे नाना पटोले, सुनील केदार यांचे प्रचार प्रमुख लाडकी बहीण योजनेसह अन्य काही योजनांच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रात बहिणी सुरक्षित नसल्याचे डांगोरा पिटला जात आहे. ‘आमच्याकडे माल आला आहे’, ‘ही बकरी आहे’ अशी वक्तव्ये मविआतील मंडळी करत आहेत. कुठे गेली तुमची संस्कृती, संस्कार. खरे तर अशा वाचाळवीरांपासून बहिणींना सुरक्षा दिली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर उभारा
उद्धव ठाकरे सुरतला जाऊन शिवरायांचे मंदिर बांधणार असे म्हणत आहेत. पण २२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी तेथे मंदिर उभारले आहे. तुम्हाला शिवरायांचे मंदिरच उभारायचे असेल तर मुंब्र्यात जाऊन उभारावे, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पहिले मंदिर तेथेच उभे करू, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
गादीचा अपमान..
सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळा मानसन्मान आहे. या गादीच्या वारसदारांचा अपमान काल केला गेला. एवढी मस्ती कशी आली. गादीचा अपमान कोणी केला, असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी गादीचा अपमान करताना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा, असा दम दिला.