कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी निम्म्या मतदारसंघांत बंडखोरांच्या हातात गुलाल
By विश्वास पाटील | Published: November 15, 2024 03:48 PM2024-11-15T15:48:28+5:302024-11-15T15:49:26+5:30
मुश्रीफ डबल हॅटट्रिकच्या प्रतीक्षेत : पाच जण प्रथमच आजमावत आहेत विधानसभेची लढाई
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी किमान निम्म्या मतदारसंघांत बंडखोर उमेदवार गुलाल कुणाला लावायचा, हे ठरवतील असे चित्र आहे. चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघात चांगली मते घेणारे बंडखोर रिंगणात आहेत. त्यातही चंदगड मतदारसंघात दोन्हीकडे बंडखोरीची डोकेदुखी आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल मतदारसंघात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे डबल हॅटट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत. पाच उमेदवार प्रथमच विधानसभेला आपले नशीब आजमावत आहेत.
शिवसेना व राष्ट्रवादी फुटण्याच्या अगोदर जिल्ह्यात आघाडीचे सहा आमदार होते. युतीचे चार होते. आता युतीचे सहा, तर आघाडीकडे काँग्रेसचेच चार आमदार आहेत. लोकसभेला आघाडीची चांगली हवा झाली तरी आता आहे त्या जागा कायम राखण्यासाठी आघाडीला संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत युतीकडे तगडे उमेदवार, सत्तेचे पाठबळ, आर्थिक ताकद जास्त असल्याने सर्वच मतदारसंघांत लढती अत्यंत अटीतटीच्या होत आहेत.
कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक अशी लढत होत आहे. कुणी किती कोटींची विकासकामे केली हाच निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे. करवीरमध्ये काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके अशी लढत होत आहे. तिथे स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतरची सहानुभूती कुणाला तारते, यावर निकाल लागेल. ‘जनसुराज्य’च्या संताजी घोरपडे यांनी येथे बंडखोरी केली आहे.
कागल मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार झालेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरदचंद्र पवार पक्षाच्या समरजित घाटगे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. मुश्रीफ यांची विकासकामांतून मतदारसंघावर मांड आहे. ती समरजित कितपत भेदतात, हे महत्त्वाचे ठरेल. राधानगरीत शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्यात पारंपरिक झुंज होत आहे. के.पी. यांचा आबिटकर यांनी सलग दोनवेळा पराभव केला आहे, त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे.
चंदगडला जिल्ह्यातील सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. नंदाताई बाभूळकर अशी मुख्य लढत होत आहे. त्याशिवाय भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील, मानसिंग खोराटे हे रिंगणात आहेत. कोण कुणाचा पाय ओढतो, त्यावर निकाल ठरेल.
शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे विरुद्ध उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यात सामना होत आहे. तिथे कोरे यांनी सत्यजित यांना लोकसभा निवडणुकीतही रोखले आहे. हातकणंगले मतदारसंघात काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांच्याविरोधात जनसुराज्यचे अशोकराव माने मैदानात उतरले आहेत. तिथे माजी आमदार सुजित मिणचेकर ऐनवेळी उद्धवसेनेला सोडून स्वाभिमानी पक्षात गेले व त्यांच्याकडून लढत आहेत. जातीची एकगठ्ठा मते येथे कायमच निर्णायक ठरली आहेत.
शिरोळला आमदार राजेंद्र पाटील महायुतीतूनच; परंतु शाहू आघाडीतून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने गणपतराव पाटील यांना संधी दिली आहे. माजी आमदार उल्हास पाटील स्वाभिमानीकडून रिंगणात आहेत. ते कुणाचे गणित बिघडवतात, याचीच उत्सुकता आहे.
इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांंच्यात थेट लढत आहे. आवाडे घराण्याचे इचलकरंजी शहरावरील राजकीय वर्चस्व अबाधित राहणार का? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मतदानास अजून दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या दिवसांत बऱ्याच घडामोडी होणार असल्याने कोणत्याच मतदारसंघात या क्षणाला निवडून येऊ शकतो, असे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही.
कोल्हापूरकरांची कसोटी..
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवारीचा फारच घोळ घातला. त्यात पक्षाची पिछेहाट झाली. आता पक्षाने तिथे सामान्य माजी नगरसेवकाला रिंगणात उतरवले आहे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर हे लढत देत आहेत. क्षीरसागर हे सर्वच पातळीवर तगडे उमेदवार आहेत. जागरूक कोल्हापूर दोन्ही राजेश यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरवतील. त्याअर्थाने कोल्हापूरकरांचीही यावेळेला कसोटीच आहे.
महायुतीत शिंदेसेनेला तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा
- महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला सर्वाधिक ३, भाजप, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी २ जागा आल्या आहेत. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू आघाडीतून लढत आहेत.
- महाविकास आघाडीत सर्वाधिक ५ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ३, तर उद्धवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत. मावळत्या सभागृहात युतीकडे ६, तर आघाडीकडे ४ आमदार आहेत.
सध्याचे चित्र
मतदारसंघ - आमदार - पक्ष - मिळालेली मते - टक्केवारी
चंदगड - राजेश पाटील - राष्ट्रवादी - ५५५५८ - २५.१९
राधानगरी - प्रकाश आबिटकर - शिवसेना - १०५८८१ -४२.८६
कागल - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - ११६४३६ -४४.१७
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील- काँग्रेस - १४०१०३ - ५७.५०
करवीर - पी.एन.पाटील - काँग्रेस - १३५६७५ - ५२.९१
कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव- काँग्रेस - ९१०५३ - ५१.९७
शाहूवाडी - विनय कोरे - जनसुराज्य पक्ष - १२४८६८ - ५३.९४
हातकणंगले - राजूबाबा आवळे - काँग्रेस - ७३७२० - ३१.५७
इचलकरंजी - प्रकाश आवाडे - ११६८८६ - ५८.०७
शिरोळ - राजेंद्र यड्रावकर - ९००३८ - ३८.४६
२०२२ पोटनिवडणूक
कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव - ९७३३२ - ५४.३४