हसन मुश्रीफ गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक नेता : प्रफुल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:44 PM2024-11-18T12:44:25+5:302024-11-18T12:45:19+5:30
समरजित, तुम्ही तर डबक्यातील बेडूक - संजय घाटगे
कागल : हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या. हे नेतृत्व सांभाळणं, जोपासणं आणि अजूनही मोठं करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही आवाहन त्यांनी केले. कागलमध्येहसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
पटेल म्हणाले, शरद पवार यांचा आम्ही सन्मानच केला. त्यांना कधीही एकसुद्धा उलट प्रश्न केला नाही. मी पवारसाहेबांना हे नम्रपणे सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मानून मुश्रीफ वाटचाल करत आहेत. त्यांना दुसरे कोणतेही लेबल लावू नका. आम्ही कधीही शिव-शाहूंच्या विचारांशी तडजोड केली नाही.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, समरजित घाटगे यांनी सिद्धनेर्लीतील दलित समाजाची जमीन काढून घेतल्याने या निवडणुकीत त्यांना जन्माची अद्दल घडवूया. ‘गोकुळ’चे संचालक अंबरीश घाटगे, उत्तम कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, विजय काळे, संजय हेगडे, दत्ताजी देसाई, वैष्णवी चितारी, तानाजी कुरणे, प्रभाकर कांबळे, साक्षी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
ईडीकडे तक्रार करणार
समरजित घाटगेंनी बंद पाडलेल्या, विकून मोडून खालेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे ३२ कोटींचे अनुदान लाटले आहे. ही ईडीला फिट बसणारी केस आहे. निवडणूक होताच ही तक्रार ईडीकडे दाखल करू. मग बघूया समरजित घाटगे पुढच्या दाराने पळतात, मागच्या दाराने पळतात की वरच्या दाराने पळतात...? असे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले.
लाखाहून अधिक मताधिक्य
मुश्रीफ म्हणाले, कागलसह गडहिंग्लज, मुरगूड, उत्तूर, कसबा सांगाव, सेनापती कापशी येथील सभांना लोकगंगेला आलेला महापूर पाहता या निवडणुकीत मी लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
समरजित, तुम्ही तर डबक्यातील बेडूक
संजय घाटगे म्हणाले, समरजित घाटगे यांची अनेक सभांतील बालिशपणाची भाषणे ऐकून, मला आता असे वाटायला लागले आहे, की डबक्यातील बेडूक माशाला म्हणतो, ‘तुला पोहता येते का? गांडूळ शेषनागाला विचारतो तुला फणा काढता येतो का? डोमकावळा गरुडाला विचारतो तुला झेप घेता येते का..?’