Radhanagari Vidhan Sabha Election 2024: राधानगरीत हॅट्ट्रिक साधत प्रकाश आबिटकर ठरले 'भारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:57 PM2024-11-24T18:57:38+5:302024-11-24T18:58:15+5:30
शिवाजी सावंत गारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ...
शिवाजी सावंत
गारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांचा ३८ हजार २५९ मतांनी दारूण पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. आमदार आबिटकर यांना १ लाख ४४ हजार ३५९ इतकी मते मिळाली तर माजी आमदार के.पी. पाटील यांना १ लाख ६ हजार १०९ इतकी मते मिळाली. आमदार आबिटकर यांना तिसऱ्यांदा विजयी करून मतदारांनी मतपेटीतून पुन्हा ‘प्रकाश’राज आणले. सलग तिसऱ्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांना मतदारांनी नाकारले.
येथील मौनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून आमदार आबिटकर यांचा मताधिक्याचा आलेख चढता राहिला. कोणत्याही फेरीत के.पी. पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. दहाव्या फेरीअखेर मताधिक्य वाढत राहिल्याने आमदारप्रेमी उत्साही कार्यकर्त्यांनी गावागावांत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली.
महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची संख्या अधिक आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी भक्कम ताकद लावली होती. आमदार सतेज पाटील यांनी कडक प्रचार यंत्रणा लावली होती. त्यामुळे सुरूवातीपासूनच त्यांचे पारडे जड वाटत होते. त्यांच्या आव्हानाला आमदार आबिटकर हे महायुतीतील मित्रपक्ष आणि भाजपला सोबत घेऊन विकास कामांच्या जोरावर एकाकी झुंज देत होते.
सर्व सहकारी, पक्षाच्या नेत्यांनी दिलेले कानमंत्र आणि अर्जुन आबिटकर यांनी लावलेल्या ‘जोडण्या’, मतदारांनी निरपेक्ष भावनेने दिलेले मतदान, लाडक्या बहिणींनी दिलेली ओवाळणी या चार सूत्रीमुळे आमदार आबिटकर यांनी विजयाची मोहर उमटवली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा अधिक ईर्षेने आणि चुरशीने ही निवडणूक लढली गेली.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण जनतेने नेत्यांच्या फॅक्टरपेक्षा मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करून आमदार आबिटकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. विकासकामांचा डोंगर उभा करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. गेल्या दहा वर्षांत ते चोवीस तास सर्वसामान्यांसाठी उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीसोबत थेट संपर्क, विकासाचा आश्वासक चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्या. तर के.पी. पाटील यांचा मतदारसंघात लोकसंपर्काचा अभाव, विकासाचा कोणताही आराखडा न सांगता केवळ गद्दार आणि गाडण्याची भाषा लोकांना आवडली नाही. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सत्तेत असतानाही कोणताही ठोस विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांनी ‘लई भारी बसा घरी !’ म्हणत पराभव केला.
- झालेले मतदान ७८.३० टक्के
- पुरुष- १४०३१५
- स्त्री- १२९३६५
- इतर- ९
- एकूण- २,६९,६८९
पराभूत उमेदवार
- उद्धवसेनेचे के.पी. पाटील १ लाख ६ हजार १००
- अपक्ष- ए.वाय. पाटील १८ हजार ८९१
- मनसे- युवराज येडूरे ६०४
- बसपा- पांडुरंग गणपती कांबळे ५६९
- अपक्ष- कृष्णात पाटील ११५७
- कदरतूल्ला लतिफ १४९
- नोटा- ९९६
२०१९ च्या निवडणुकीत आमदार आबिटकर यांना १८ हजार ४३० तर यंदा २० हजार मतांची वाढ होऊन ३८ हजार २५९ चे मताधिक्य मिळाले
- आमदार आबिटकर- १,४२,१०५
- के.पी. पाटील- १,०६,१००
- मताधिक्य- ३८,२५९
विजयाची कारणे
- मतदारसंघाच्या विकासाची खात्री आणि भरीव कामगिरी करणार असा जनतेला असलेला विश्वास
- कार्यकाळात विकासकामांचा डोंगर उभा करून आरोग्य, शैक्षणिक, रस्ते, पर्यटन या क्षेत्रात नेत्रदीपक काम,
- अतूट असा जबरदस्त लोकसंपर्क,
- लाडक्या बहिणींनी दिलेली साथ
पराभवाची कारणे
- मतदारसंघात दहा वर्षांत अत्यल्प जनसंपर्क
- विकासाच्या दूरदृष्टीचा अभाव,
- लोकांनी निवडणूक हातात घेतली.
लोकांसाठी केलेले काम, मतदारसंघाचा केलेला कायापालट यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी मताच्या रुपाने भरभरून प्रेम दिले. भविष्यात या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणार. रोजगार निर्मितीवर विशेष भर देणार. -आमदार प्रकाश आबिटकर
जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. यापुढेही राजकारण,सहकार आणि समाजकारणात आग्रही राहणार. -माजी आमदार के.पी. पाटील
नेते विरुद्ध सामान्य जनता अशी लढत
यावेळी झालेली निवडणूक ही नेते विरुद्ध सामान्य जनता अशी झाली आहे. या लढाईत सामान्य माणूस असामान्य आणि किंगमेकर ठरला आहे.
टपाली ते निकाली
आमदार आबिटकर यांनी टपाली मतपासून घेतलेली मताधिक्याची आघाडी एकतीस फेऱ्यांच्या मताधिक्याने निकाली झाली.
सेनेचा पराभव सेनेकडून
शिवसेना पक्षाच्या विभागणी नंतर दोन गटांत झालेल्या लढतीत शिंदेसेना विजयी झाली, तर उद्धव सेनेचा पराभव झाला. अशी लढत ही पहिल्यांदाच झाली आहे.
गटातटाच्या राजकारणाला तिलांजली ..
लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपल्या मतातून शिक्कामोर्तब केले. हा मतदारसंघ नेत्यांवर नाही तर कर्तृत्वावर भाळतो हे दाखवून दिले आहे.