जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:04 IST2024-11-06T17:03:44+5:302024-11-06T17:04:56+5:30
''..त्यावेळी धनंजय महाडिक बोलले का?''

जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे झालेला अपमान राज्यातील जनता विसरलेली नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर महायुती राज्यातून गायब होईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महायुतीच्या नेत्यांनी आमच्यावर बोलू नये. संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर केलेल्या टीकेवर धनंजय महाडिक बोलले का? असा सवाल आमदार पाटील यांनी केला.
कोल्हापूर उत्तरच्या माघारी नाट्यावर पडदा टाकायचा निर्णय मी घेतला आहे. जे घडले त्यावर आता बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. पुढे कसे जायचे, यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा करणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली असून, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मदत करण्याची भूमिका घेतल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
सगळ्यांना सोबत घेणार, टीका टाळणार
शिरोळमध्ये वंचितने माघार घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर उत्तरमध्येही वंचित आमच्यासोबत राहील हे आम्हाला फायदेशीर आहे. जिथे शक्य आहे तिथे माघार घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील पंधरा दिवस मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असून, मी कोणावरही टीकाटिप्पणी करणार नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.