कागलची यंदाची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक, पालकमंत्री मुश्रीफ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 01:20 PM2024-10-26T13:20:26+5:302024-10-26T13:21:11+5:30
बोरवडे : मी केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. यंदाची निवडणूक ही ‘नायक विरुद्ध खलनायक’ अशी ...
बोरवडे : मी केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. यंदाची निवडणूक ही ‘नायक विरुद्ध खलनायक’ अशी होणार असून जनतेने आपल्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बोरवडे ( ता. कागल ) येथे आयोजित गाव भेट दौऱ्यात ते बोलत होते. रघुनाथ कुंभार अध्यक्षस्थांनी होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपण केलेल्या प्रचंड कामाच्या बळावर आपला सहावा विजय निश्चित असून, यंदाच्या विजयात संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा वाटा निश्चितच मोठा असणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्यात मानसन्मान देण्याचा आपण शब्द दिला असून, त्याला तडा जाऊ देणार नाही.
माजी आमदार घाटगे म्हणाले, अनेक वर्षे आपल्याला सामान्य माणसांनी पाठबळ दिले. परंतु सत्तेच्या राजकारणात त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यात आपण कमी पडलो. त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी आपण मुश्रीफ यांना बिनशर्त पाठिंबा दिला.
बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे म्हणाले, कागल मतदार संघात एकही असे गाव नाही, की त्या गावात मुश्रीफ यांची रुग्णसेवा पोहचली नाही.
यावेळी रघुनाथ कुंभार यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी साताप्पा साठे, तानाजी साठे, सुनील मगदूम, जयदीप पोवार, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव फराकटे, प्रदीप कांबळे, उपसरपंच विनोद वारके आदी उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी स्वागत केले. उपसरपंच विनोद वारके यांनी आभार मानले.
मुश्रीफ गहिवरले..!
मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभेच्या सहाही निवडणुकांत बोरवडे गावाने त्यांना महत्त्वपूर्ण मताधिक्य दिले होते. गावचे माजी सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांनी मंत्री मुश्रीफ यांची सातत्याने पाठराखण केली. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर प्रथमच झालेल्या संवाद भेटीवेळी सर्वच वक्त्यांनी स्व. फराकटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मंत्री मुश्रीफही त्यांच्या आठवणीने गहिवरले.