निवडणुकीसाठी आश्वासनांचा महापूर, किती वर्षे नुसतीच चर्चा अन् कोल्हापूरकरांची बोळवण करणार?
By भारत चव्हाण | Published: November 7, 2024 03:27 PM2024-11-07T15:27:29+5:302024-11-07T15:28:32+5:30
एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही
भारत चव्हाण
कोल्हापूर : अनेक वर्षे सत्तेत राहिलेले तसेच सत्तेबाहेर राहिलेले सर्वपक्षीय नेते प्रत्येक निवडणुकीत पंचगंगा प्रदूषण, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, शाहू मिलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक, कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु यातील एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही. तरीही यंदाच्या निवडणुकीत नेतेमंडळी या प्रश्नावर चर्चा करताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे नुसती वाफाळ चर्चा आणि बोळवण करण्याचे काम सुरू आहे.
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कोल्हापुरात झाला. तेंव्हा निवडणुकीच्या व्यासपीठावर नेते मंडळींनी कोल्हापूरच्या प्रश्नांना हात घातला. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत जो अनुभव येतो तोच अनुभव याही वेळेला येऊ लागला आहे. अगदी परवाच्या लोकसभेला निवडणुकीत जी आश्वासने दिली होती तीच पुन्हा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या आवाजात दिली आणि आपणच कसे कोल्हापूरचे हितकर्ते आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
पंचगंगा प्रदूषण तसेच महापुराचे पाणी वळवण्यासाठीच्या ३२०० कोटींच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी कोल्हापूरच्या महापुरावर उपाययोजना म्हणूनच नाही तर दुष्काळी भागाला पाणी नेण्याचा हा महत्वाकांक्षी प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जातून हा प्रयोग होत आहे. याची गेल्या दहा वर्षापासून नुसती चर्चाच सुरू आहे. ३२०० कोटींचा निधी प्रत्यक्षात येणार कधी..? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या बाबतीत तर अनेक सरकारनी अनेक वेळा आश्वासने दिली, परंतु या आराखड्यातील मंजूर निधीतील नऊ कोटी रुपये मिळाले आहेत, बाकीचा निधी अद्यापही कागदावरच आहे. पहिल्या टप्प्यातील कामापैकी केवळ बहुमजली वाहनतळाचे काम रडतखडत पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दर्शनरांग, भक्तनिवास याची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना आजही उन्हात उभे राहून दर्शन घ्यावे लागते. स्वच्छ मुतारीची शोधाशोध करावी लागते. काही काही वेळेला राहण्यासाठी जागा न मिळाल्याने भाविक, पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
शाहूमिल स्मारकाबद्दल उदासीनता
शाहूमिलच्या जागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकावर देखील वारंवार चर्चा होत असते. परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नाही. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही जागा राज्य सरकारकडे वर्ग करून घ्यायलाही राज्यकर्त्यांना जमलेले नाही. इतकी उदासीनता या स्मारकाच्या बाबतीत आहे.
हद्दवाढीची बोळवण
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा कोल्हापूरकरांना आश्वासित केले. मोठ्या जोषपूर्ण भाषणात नेते मंडळीनी आश्वासने दिली, पण केले काहीच नाही, उलट कोल्हापूरकरांनीच एकमत करावे, अशी सूचना करून या प्रश्नावर अक्षरश: बोळवण करण्यात आली.
रस्त्यांची स्थिती दयनीय..
कोल्हापूरातील अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. याच शासनाने त्यासाठी १०० कोटींची निधी दिला. परंतु त्यातील रस्ते अजून झालेले नाहीत. आजपर्यंत निधी नाही म्हणून रस्ते होत नाहीत असे सांगितले जाई आता निधी असूनही लोकांची खड्ड्यांनी कंबर मोडत आहे परंतु त्याचे उत्तर कोणत्याच नेत्याने दिले नाही.