Vidhan Sabha Election 2024: मतदानात कोल्हापूर राज्यात भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:50 PM2024-11-21T13:50:20+5:302024-11-21T13:54:19+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवारी चुरशीने ७६ टक्के मतदान झाले. रात्री ११ वाजता जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आलेली ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Kolhapur district has the highest voter turnout in the state in assembly elections | Vidhan Sabha Election 2024: मतदानात कोल्हापूर राज्यात भारी

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवारी चुरशीने ७६ टक्के मतदान झाले. रात्री ११ वाजता जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आलेली ही मतदानाची आकडेवारी आहे. दरम्यान, मतदानाची वेळ संपल्यानंतरही जिल्ह्यातील २०० मतदान केंद्रांवर रांगा होत्या. परिणामी अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत संकलित झाली नाही. यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीतही किरकोळ बदल होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अंतिम आकडेवारी आज, गुरुवारी निश्चित होणार आहे. दोन ठिकाणी मशीन बंद, बोगस मतदान, पैसे, पास वाटपाच्या तक्रारी काही ठिकाणी झाली. परंतु एवढी चुरस असूनही सर्वत्र मतदान शांततेत झाले.

मतदार थेट बोलत नसले तरी अनेक मतदारसंघात मातब्बरांच्या दांड्या उडतील असे वातावरण दिसून आले. दहा मतदारसंघांसाठी १२१ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच आहे.

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरदचंद्र पवार पक्षाच्या समरजित घाटगे यांनी तगडे आव्हान दिले. तिथे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त होत आहे. शाहूवाडीत विनय कोरे, शिरोळला राजेंद्र यड्रावकर यांच्या लढतीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक यांच्यात पारंपरिक लढाई होत आहे. राधानगरी, करवीर आणि शाहूवाडीत सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात श्वास रोखायला लावणारी ठरली आहे. हातकणंगलेत काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, जनसुराज्यचे अशोकराव माने आणि स्वाभिमानीचे सुजित मिणचेकर यांच्यात लढत झाली. यामध्ये मिणचेकर किती मते घेतात त्यावर विजय कुणाचा हे ठरेल.

इचलकरंजीत प्रथमच शरदचंद्र पवार पक्षाच्या मदन कारंडे यांनी भाजपच्या राहुल आवाडे यांना चांगले आव्हान दिले. चंदगडला पाच उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येकानेच विजयाचा दावा केला आहे. कोल्हापूर उत्तरकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले. तिथे काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ झाला, नवख्या आणि साधा माजी नगरसेवक असलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने पुरस्कृत केले. ही लढतही चुरशीच्या वळणावर गेली आहे. प्रत्येक बाबतीत चौकस असणारा कोल्हापूरकर शिंदेसेनेचे मातब्बर नेते राजेश क्षीरसागर यांना गुलाल लावतात की सामान्य कार्यकर्त्याला खांद्यावर घेतात याचा फैसला मतदान यंत्रात बंद झाला.

शहरी भागात सकाळच्या टप्प्यात तुलनेत कमी मतदान झाले. परंतु थोडी थंडी कमी झाल्यावर दहानंतर रांगा लागल्या. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. ग्रामीण भागात मात्र प्रत्येक उमेदवाराने आपापले हक्काचे मतदान सकाळच्या टप्प्यात बाहेर काढल्याने रांगाच रांगा लागल्या. त्यात जिथे चुरशीची दुरंगी लढत आहे तिथे तर एकेक मतांसाठी यंत्रणा लावली होती. लोकांनी मतदानाचे पवित्र कार्य करूनच शेतीच्या कामांना जाणे पसंत केले. मतदारांना आणण्यासाठी कोणीच कसर ठेवली नव्हती. 

स्थिती काय..?

मावळत्या सभागृहात महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीकडे एकट्या काँग्रेसचेच चार आमदार आहेत. या निवडणुकीत दोन्हीकडून सहा प्रमुख पक्ष मैदानात होते. त्यामुळे जनमतही दुभंगलेले दिसून आले. लोकांनी व्यक्त होण्यापेक्षा मतांची ताकद दाखवण्याचीच भूमिका घेतल्याचे चित्र जिल्हाभर दिसले.

मतदारसंघ - २०२४ मतदान (टक्के) - २०१९ मतदान (टक्के)

  • चंदगड : ७५ - ६८.७६
  • राधानगरी : ७८.७२ - ७५.६६
  • कागल : ८१.७२ - ८१.४२
  • दक्षिण : ७४.९५ - ७५.३
  • करवीर : ८५ - ८४.४१
  • कोल्हापूर उत्तर : ६६ - ६१.२५
  • शाहूवाडी : ७९.४ - ८०.२२
  • हातकणंगले : ७३ - ७३.४६
  • इचलकरंजी : ६८.९५ - ६८.५९
  • शिरोळ : ७८ - ७४.७८
  • एकूण : ७६.५० - ७४.४५

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Kolhapur district has the highest voter turnout in the state in assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.