आचारसंहिता भंगाच्या कोल्हापूर ‘दक्षिण’मध्ये सर्वाधिक तक्रारी, 'या' मतदारसंघांतून एकही तक्रार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:49 AM2024-11-11T11:49:52+5:302024-11-11T11:51:06+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यान्वित केलेल्या सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत २८ तक्रारी आल्या ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यान्वित केलेल्या सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत २८ तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक १२ तक्रारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून या ॲपवर एकही तक्रार दाखल झालेली नाही. ॲपवर आलेल्या प्रत्येक तक्रारीचे शंभर मिनिटांत निरसन करण्यासाठी जिल्ह्यात ९२ पथके कार्यरत आहेत. तरीही तक्रारीचा ओघ कमीच असल्याने निवडणूक यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे.
विधानसभेसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. या कालावधीत विनापरवाना प्रचार फलक लावले, उमेदवार, समर्थकांनी पैसे वाटप करणे, प्रचाराच्या लाऊड स्पीकरचा आवाज मर्यादेचे उल्लंघन करणे, जातीय द्वेषयुक्त भाषण करणे, अवैध मद्य वाटप किंवा वाहतूक करणे, बंदूक दाखवणे किंवा धमकावणे, प्रलोभन दाखवणे अशा घटनांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आयोगाने सी-व्हिजील ॲप सुरू केले आहे. याचा प्रभावी वापर होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने जागृतीही केली आहे. पण या निवडणुकीत ॲपवर तक्रारी येण्याचे प्रमाण कमी आहे.
सी-व्हिजील ॲप डाऊनलोड करणे, वापरणे सोपे आहे. निवडणुकीसंबंधीच्या गैरप्रकारांबाबत फोटो, व्हिडीओ काढून ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन १०० मिनिटांत निवडणूक यंत्रणेची फिरती भरारी पथक घटनास्थळी पोहोचून तक्रारींचे निवारण करीत आहेत. यासाठी ९२ पथके कार्यरत आहेत. एका पथकात तीन कर्मचारी आहेत. ही पथके फिरती आहेत. यामुळे तक्रारी आली की ती सक्रिय होऊन तातडीने कार्यवाही करतात. या ॲपवरून दिलेली माहिती आणि तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जात आहे. तरीही ॲपवरून अजून पाच विधानसभा मतदारसंघांतून एकही तक्रार आलेली नाही. तक्रार करण्याकडे सुज्ञ मतदारांनी का पाठ फिरवली आहे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या मतदारसंघातून एकही तक्रार नाही..
इचलकरंजी, चंदगड, शिरोळ, करवीर, राधानगरी विधानसभा मतदारसंघांतून ॲपवर एकही तक्रार आलेली नाही. या सर्व मतदारसंघांत चुरशीने लढत होत आहे. जेवणावळी, आमिषे, शपथा सुरू असल्याची उघड चर्चा सुरू आहे. तरीही तक्रारी दाखल झालेली नाही. यामुळे कशाला तक्रार करायची, मिळतंय तर घ्या की? अशी मानसिकता मतदारामध्ये बळावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाखल तक्रारींची संख्या
मतदारसंघनिहाय अशी
दक्षिण : १२, उत्तर : ९, कागल : ३, हातकणंगले : २, शाहूवाडी : १
बॅनर, पोस्टर लावल्याच्या अधिक
आतापर्यंत आलेल्या २८ तक्रारींत सर्वाधिक तक्रारी या विनापरवाना प्रचार बॅनर, पोस्टर, फलक लावण्याच्या तक्रारी आहेत. जाहीर भाषणातून आमिषे, धमकीची भाषा काही ठिकाणी वापरली जात आहेत. पण याची तक्रार ॲपवरून झालेली नाही, हे विशेष आहे.