बारा बंधाऱ्यांचा अजून मुहूर्त नाही, विकासकामांची टिमकी कशाला वाजवता; के.पी.पाटील यांची आबिटकर यांच्यावर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:32 PM2024-11-12T14:32:24+5:302024-11-12T14:33:01+5:30
टक्केवारीत जुळले नाही म्हणून..?
शिरगाव : मी आमदार असताना लोंढा नाला लघुपाटबंधारे तलावाखाली कोल्हापूर पद्धतीचे अठरा बंधारे मंजूर झाले. त्यापैकी तब्बल बारा बंधाऱ्यांच्या कामाला अजून तुम्ही सुरुवातही केली नाही. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे केल्याची टिमकी कशाला वाजवता? अशी बोचरी टीका के. पी. पाटील यांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर केली. शिरगाव (ता. राधानगरी) येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
के.पी.पाटील म्हणाले, “धामोड परिसरातील डोंगराळ भाग सुजलाम्-सुफलाम् व्हावा यासाठी पाणी अडवण्याच्या हेतूने माझ्या काळात अठरा बंधारे मंजूर झाले होते. आमदारांनी त्यापैकी अवचितवाडीजवळचे काम दोन वर्षे रेंगाळलेल्या स्थितीत ठेवले असून बारा बंधाऱ्यांच्या कामाला अद्याप त्यांनी सुरुवातच केलेली नाही. तेथील शेतीसाठी या बंधाऱ्यांची गरज असताना त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे आमदार विकासकामांच्या मोठ्या गप्पा मारण्यात मश्गुल आहेत. विधानसभेत गेल्यानंतर मी हा प्रश्न प्राधान्याने हाताळणार आहे.”
ज्येष्ठ नेते श्यामराव देसाई म्हणाले, “भुदरगड तालुक्यात आता आबिटकर विरोधी नाराजीची मोठी लाट तयार झाली असून, तेच वातावरण राधानगरी व आजरा तालुक्यांतही आहे.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक आर. के. मोरे, भोगावतीचे माजी संचालक ए. डी. चौगले, दीपसिंह नवणे यांची भाषणे झाली. माजी सभापती संजय कलिकते यांनी स्वागत केले. सभेला ज्येष्ठ नेते पी. डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर, राहुल देसाई, सुरेश चौगले, संग्राम कलिकते, प्रसाद पिल्लारे, विजय व्हरकट, प्रशांत पाटील उपस्थित होते. बाजीराव महाडेश्वर यांनी आभार मानले.
टक्केवारीत जुळले नाही म्हणून..?
के. पी. पाटील म्हणाले, “मंजूर असलेल्या बारा बंधाऱ्यांच्या पायासाठी एक दगडही आमदारांच्या काळात रचलेला नाही. याबाबत परिसरातील शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. टक्केवारीत जुळले नाही की काय..? म्हणूनच या कामांना सुरुवात झाली नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.