महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:35 PM2024-11-06T12:35:24+5:302024-11-06T12:36:23+5:30

महायुतीच्या प्रचाराचा कोल्हापुरात दणक्यात प्रारंभ

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MahaVikas Aghadi means the killer of development says Chief Minister Eknath Shinde; Ten promises announced | महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने 

महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने 

कोल्हापूर : महाविकास आघाडीने अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. येथील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपब्लिकन नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

‘केलंय काम भारी..आता पुढची तयारी’ अशी टॅगलाइन असलेल्या महायुती विजय निर्धार सभेचे आयोजन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील विनय कोरे वगळता सर्व उमेदवार उपस्थित होते.

धनुष्यबाण हाच आमचा प्राण आहे, तो वाचवण्यासाठीच शिवसेनेच्या ५० आमदारांनी सत्ता सोडली. तसे आम्ही केले नसते तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी काँग्रेसला विकली असती असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. ते म्हणाले, तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तो खरा महाराष्ट्रद्रोह आहे.

महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत आणि उद्योगातही एक नंबरलाच आहे. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या अडीच वर्षात काय केले याचा हिशेब द्या, आम्ही आमच्या सव्वादोन वर्षाच्या कामाचा हिशेब द्यायला तयार आहोत. एकदा होऊनच जाऊ दे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’.

आताही तुम्ही सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे सांगत आहात. गोरगरिबांच्या हिताच्या योजनांची चौकशी लावू म्हणत आहात. तुम्ही प्रकल्प बंद पाडले, शेतकऱ्यांच्या योजना बंद केल्या. आम्ही काम करणारे आहोत, तुम्ही काम बंद पाडणारे आहात. अशा लोकांच्या ताब्यात पुन्हा महाराष्ट्र देऊ नका.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देऊ नका. खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानले. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, राजेश पाटील, चंद्रदीप नरके, अशोकराव माने,राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर, राहूल आवाडे, शौमिका महाडिक यांच्यासह तीनही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शक्तिपीठ ज्यांना हवे त्यांना देऊ..

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर परिसरातून विरोध झाला, ज्यांना हा प्रकल्प नको असेल त्यांच्या मागे आम्ही लागणार नाही. ज्यांना तो हवा असेल त्यांना देऊ अशा घोषणेचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

बाबासाहेब तेरा संविधान रहेगा

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केल्याने वेगळा निकाल लागला. परंतु यावेळेला या प्रचाराला जनता भुलणार नाही. कारण ‘जबतक सुरज-चाँद रहेगाबाबासाहब तेरा संविधान रहेगा अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

वारं फिरलंय

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचं ठरलंय अशी घोषणा कोल्हापूरात गाजली होती परंतू कोल्हापूरात आता वारं फिरलंय. यावेळी सर्वच प्रमुख वक्त्यांनी राजघराण्याच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करून सतेज पाटील यांना लक्ष्य केले. शिंदे म्हणाले, कोल्हापुरात आधी धनुष्यबाण होता. नंतर इथं हात आणला गेला. पण बाळासाहेब ठाकरे वरून बघत होते आणि हा हातही गायब झाला. फडणवीस म्हणाले, काल कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब झालाय आता आपल्याला कोल्हापूर दक्षिणमधूनही पंजा गायब करायचा आहे.

सत्यजित कदम, जालंदर पाटील शिंदेसेनेत

भाजपचे शहरातील नेते सत्यजित कदम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी फडणवीस यांनीही कदम यांच्या पाठीवर थाप मारली. स्वाभिमानी पक्षाचे राज्याध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदे यांच्या हस्ते यावेळी उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांचे स्वागत करण्यात आले.

लॉकडाऊन आवडीचा विषय

लॉकडाऊन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. हा विषय निघाला की मी आणि अजितदादा एकमेकांकडे पाहून हसत होतो अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली. इकडे माणसे मरत होती आणि तिकडे हे कोविड सेंटरमधून मिळवलेले पैसे मोजत होते असा हल्लाबोल त्यांनी केला.

आघाडीला तुमचा चेहरा चालत नाही

शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना चिमटेही काढले. ते म्हणाले, अहो आम्ही दिल्लीला राज्याला निधी आणण्यासाठी जातो. तुम्ही मुख्यमंत्रीपद मागायला जाता. अहो, तुमचा महाविकास आघाडीला चेहरा चालत नाही तर तो महाराष्ट्राला काय चालणार?

महायुतीने जाहीर केली दहा वचने 

  • लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करणार. 
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार असून शेतकरी सन्मान योजना १२ हजारांवरून १५ हजार करण्याचे आणि एम.एस.पी. वर २० टक्के अनुदान देणार.
  • प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार 
  • वृद्ध पेन्शन धारकांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार
  • २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देणार
  • ४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधणार 
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपयांचे वेतन आणि सुरक्षा कवच
  • वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
  • सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र २०२९’ आराखडा १०० दिवसात सादर करणार 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MahaVikas Aghadi means the killer of development says Chief Minister Eknath Shinde; Ten promises announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.