खास विमानाने कोल्हापुरातील महायुतीचे आमदार मुंबईला रवाना
By समीर देशपांडे | Published: November 24, 2024 12:15 PM2024-11-24T12:15:24+5:302024-11-24T12:17:04+5:30
कोल्हापूर : खास विमानाने महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार ...
कोल्हापूर : खास विमानाने महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ हे शनिवारी रात्रीच रवाना झाले असून जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने हे दुपारी एकत्रितपणे मुंबईला जाणार आहे.
काल, शनिवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तातडीने या सर्वांना नेण्यासाठी योजना आखण्यात आली होती. परंतू निकालच एकतर्फी लागल्यामुळे ती बारगळली. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा ‘तातडीने या’ असा निरोप आल्याने मुश्रीफ मुंबईला शनिवारी रात्रीच रवाना झाले. दरम्यान रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी महायुतीच्या आमदारांसाठी खास विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्याआधी शनिवारी रात्रीच सर्वांना निरोप देण्यात आले होते. त्यानुसार सर्वजण अकराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले.
खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहूल आवाडे हे मुंबईला रवाना झाले. शपथविधीनंतरच हे सर्वजण मतदारसंघात येण्याची शक्यता आहे.