बंटी पाटील खुनशी, मित्रपक्षांना संपवतात; धनंजय महाडिक यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:08 PM2024-11-18T12:08:52+5:302024-11-18T12:09:42+5:30

मुन्ना महाडिक यांचा भांग विस्कटणारा या पृथ्वीतलावर जन्माला यायचा आहे

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil | बंटी पाटील खुनशी, मित्रपक्षांना संपवतात; धनंजय महाडिक यांचा आरोप 

बंटी पाटील खुनशी, मित्रपक्षांना संपवतात; धनंजय महाडिक यांचा आरोप 

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी बंटी पाटील यांच्यासारखे वागलो, तर मित्रपक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले आहे. यावरून बंटी पाटील यांचे राजकारण खुनशी असल्याचे स्पष्ट होते. ते मित्र पक्षांना संपवतात, असा घणाघाती आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. चार आमदार असूनही त्यांनी विकास केला नाही. आयआरबी कंपनीला आणून टोल लादला होता. मुद्दाम टोलची पावती फाडली होती, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. तपोवन मैदानात महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, अडीच वर्षांत थेट पाइपलाइन योजना पूर्ण झाली नाही, तर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली होती. पण, त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. थेट पाइपलाइनच्या पाण्यात अभ्यंगस्नान केले. पण, अजूनही शहराला पाणीपुरवठा होत नाही. त्यांनी छत्रपती घराण्यातील सूनेचा अवमान केला, असे बंटी पाटील माझ्यावर महिलांचा अवमान करतो, असे आरोप करतात. महायुतीचे सरकार आल्यावर कोल्हापूर विमानतळ, रेल्वे स्टेशनला भरीव निधी मिळाला. वंदे मातरम रेल्वे मिळाली. महामार्गचे काम गतीने होत आहे. मात्र, काॅंग्रेसकडे कोणतेही सांगण्यासारखे विकासाचे काम नसल्याने ते खोटे आरोप करीत आहेत.

अमल महाडिक म्हणाले, दक्षिण-उत्तरसह युतीच्या सर्व जागा निवडून येणार याची खात्री आहे. मी कमी बोलत असलो, तरी समोर बसलेली जनता हाच माझा खरा आवाज आहे. याच जोरावर दक्षिणमध्ये कमळ फुलवणार आहे. मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मला विजयी करा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

उमेदवार राजेश क्षीरसागर म्हणाले, महायुतीच्या सरकारने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचे सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेतो. खासदार धैर्यशील माने म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आले. त्यामुळे मला एका शहरातून ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. आता दक्षिणमधून अमल महाडिक, उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके यांचा विजय निश्चित आहे.

चंद्रदीप नरके म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक विकासकामे केली. यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार आणि काॅंग्रेसच्या नेत्याची दहशत संपणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजपचे जिल्हाअध्यक्ष विजय जाधव, राहुल चिक्कोडे, उत्तम कांबळे, संतोष उर्फ बाळ महाराज, महेश जााधव, प्रा. मच्छिंद्र सकटे यांची भाषणे झाली. मेळाव्यास उमेदवार अशोकराव माने, सुजीत चव्हाण, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

भांग विस्कटणारा जन्माला यायचा आहे : महाडिक

फुलेवाडी येथील मेळाव्यात मी लाडकी बहीण योजनेबद्दल बोललो, त्याचा काँग्रेसने विपर्यास केला. राज्यभर माझ्या विरोधात गरळ ओकली. उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभेत हातपाय मोडण्याची भाषा केली. पण, मुन्ना महाडिक यांचा भांग विस्कटणारा या पृथ्वीतलावर जन्माला यायचा आहे, असे आव्हान खासदार महाडिक यांनी दिले.

त्या थांबत नाहीत..

अमल महाडिक कमी बोलतात आणि शौमिका महाडिक थांबत नाही. त्या रणरागिणीसारख्या दक्षिणचा विजय खेचून आणतील, असे खासदार माने म्हणताच प्रेक्षकांतून दाद मिळाली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.