Kolhapur politics: पन्हाळ्यातून विनय कोरे, चंद्रदीप नरकेंची विधिमंडळात वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:29 PM2024-11-25T16:29:17+5:302024-11-25T16:32:20+5:30

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभेच्या मतदारसंघ रचनेत कासारी नदीच्या सीमारेषेवरून दुभंगलेल्या पन्हाळा तालुक्याला आमदार विनय कोरे आणि ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Panhala taluka elected MLA Vinay Kore and MLA Chandradeep Narke | Kolhapur politics: पन्हाळ्यातून विनय कोरे, चंद्रदीप नरकेंची विधिमंडळात वर्णी

Kolhapur politics: पन्हाळ्यातून विनय कोरे, चंद्रदीप नरकेंची विधिमंडळात वर्णी

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभेच्या मतदारसंघ रचनेत कासारी नदीच्या सीमारेषेवरून दुभंगलेल्या पन्हाळा तालुक्याला आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांना आमदार करण्याचे भाग्य मिळाले. कोरे आणि नरके यांना तालुक्यातील जनतेने मताधिक्य देऊन मतदारसंघावर प्राबल्य मिळाले आहे.

शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांच्या बरोबरीने कोरे यांनी मतदान घेतल्याने शाहूवाडीतच सत्यजित पाटील यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते. कोरेंचे होमपिच असणाऱ्या पन्हाळ्यात सहानुभूतीऐवजी मतदारांनी विकासकामाला प्राधान्य दिल्याने प्रत्येकवेळी तालुक्यात कोरेंना मताधिक्य मिळाले आहे. कोरेंना शाहूवाडीत फोडाफोडीचं राजकारण करून सरूडकरांची दमछाक केली तसे सरूडकरांना गेल्या वीस वर्षांत पन्हाळ्यात फोडाफोडीचे राजकारण करता आले नाही. 

पन्हाळ्यातील गावागावांत कोरेंचा परस्पर विरोधी गट असला तरी तेच गट निवडणुकीत कोरेंसाठी एकदिलाने राबतात. कोरेंनी तालुक्यात उभे केलेले सहकाराचे जाळे त्यांची राजकीय ताकद बनल्याने त्यांचा विजय सोपा झाला. कोरेंनी ही निवडणूक एकतर्फी करून दाखवली आणि पाचव्यांदा आमदार होण्याची किमया केली. कोरेंना पन्हाळ्यातून ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील आणि मित्रपक्ष भाजपची मोलाची साथ मिळाली आहे.

गत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नरकेंनी पन्हाळ्यातील होमपिचवर पाच वर्षे तयारी केली होती. म्हणून गत निवडणुकीतील पराभव विसरून त्यांना नव्या दमाने संपर्क वाढवत मतदारसंघात त्यांनी “घरचा माणूस” अशी निर्माण केलेली ओळख काटावरच्या लढतीसाठी भरवशाची ठरली. राहुल पाटील यांच्याकडे सहानुभूती असली तर विकासकामे आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता म्हणून नरकेंची जमेची बाजू होती. नरकेंची काम करण्याची पद्धत, विकासकामे, जनसंपर्क, आश्वासक चेहरा म्हणून जनतेत त्यांची क्रेझ आहे.

पन्हाळ्यातून मताधिक्य मिळाले असले तरी जुन्या करवीरचा हात त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहिल्याने त्यांना विजयाच्या समीप राहता आले. निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी अपेक्षित मतदान न घेतल्याने त्यांच्या मताची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडली. याबाबत तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नरकेंच्या विजयात त्यांचे बंधू ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके, कुंभी कारखान्याचे संचालक, अजित पवार गटाचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे.

अटीतटीची लढत

कोरेंना एकतर्फी विजय मिळवून शाहूवाडी-पन्हाळ्याचा वाघ कोरेच असल्याचे सिद्ध केले तर शेवटच्या मतापर्यंत विजयाची वाट पाहायला लावणारा निकाल नरकेंच्या राजकारणाला कलाटणी देणार ठरणारा आहे. आश्वासक चेहरा, वाढता जनसंपर्क आणि कामाची हमी देणारे नेते म्हणून गेल्या पाच वर्षांत कोरे आणि नरके तयार केलेल्या ‘क्रेझ’चा त्याचा फायदा त्यांना झाला.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Panhala taluka elected MLA Vinay Kore and MLA Chandradeep Narke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.