व्हॉट्सॲप ग्रुप सेटिंग 'ओनली ॲडमिन' करण्याचे पोलिसांचे फर्मान, निवडणूक काळात शांततेसाठी उपाय

By उद्धव गोडसे | Published: November 8, 2024 01:45 PM2024-11-08T13:45:36+5:302024-11-08T13:46:47+5:30

अन्यथा कारवाईचा इशारा

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Police order to make WhatsApp group setting admin only, a solution for peace during elections | व्हॉट्सॲप ग्रुप सेटिंग 'ओनली ॲडमिन' करण्याचे पोलिसांचे फर्मान, निवडणूक काळात शांततेसाठी उपाय

व्हॉट्सॲप ग्रुप सेटिंग 'ओनली ॲडमिन' करण्याचे पोलिसांचे फर्मान, निवडणूक काळात शांततेसाठी उपाय

उद्धव गोडसे

कोल्हापूर : निवडणूक काळात सोशल मीडियातून होणारा अपप्रचार, बदनामी आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे मेसेज टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुपवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारे मेसेज कोणीही सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपला 'ओनली ॲडमिन' सेटिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

निवडणूक काळात प्रचार आणि अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. विरोधी उमेदवार, राजकीय पक्ष, नेते यांच्या रील्स, भाषणामधील काही भाग, आश्वासने, घोषणा, सभा, मेळाव्यास होणारी गर्दी फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून व्हायरल केली जाते. आपलाच नेता किंवा पक्ष सक्षम असल्याचे सांगण्यासाठी विरोधकांवर खालच्या पातळीवरील टीका केली जाते. त्यांचे फोटो वापरून छेडछाड केली जाते. आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जातो. देव-देवता, राष्ट्रपुरुष, धार्मिक अस्मितांबद्दल चुकीची वक्तव्ये करून त्यातून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम निवडणुकीवर होतात. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

बैठका घेऊन सूचना

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी त्यांच्या हद्दीतील सर्व गावांमधील पोलिस पाटील, राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, हॉटेल्स, लॉजमालक यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना दिल्या. १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान सर्व व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन ग्रुपचे सेटिंग 'ओनली ॲडमिन' असे करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी दिल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सोशल मीडियावर नजर

व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यु ट्यूब चॅनेल्स, पोर्टल अशा सर्वच सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. धार्मिक, जातीय द्वेष निर्माण करणारे, बदनामीकारक मेसेज तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे निवडणूक काळात सर्वांनीच सोशल मीडियाचा वापर जपून करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परवानगीशिवाय कार्यक्रम नाही

प्रचार सभा, मेळावे आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगी अत्यावश्यक आहे. विनापरवानगी कार्यक्रम केल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे. मतमोजणीनंतर कोणालाही मिरवणुका काढून सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करता येणार नाही. फलकबाजी करण्यावरही निर्बंध घातले आहेत.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Police order to make WhatsApp group setting admin only, a solution for peace during elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.