हुरहुर वाढली, उद्या मतदान; कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य ३३ लाख मतदारांच्या हातात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:01 PM2024-11-19T12:01:41+5:302024-11-19T12:02:28+5:30
सर्वाधिक मतदार दक्षिणमध्ये
कोल्हापूर : प्रत्येकाच्या मनातील हुरहुर शिगेला पोहोचली आहे.. गेल्या महिन्याभरापासून उमेदवार, नेत्यांसह तमाम कोल्हापूरवासीयांसाठी बहुप्रतिक्षित असलेला तो दिवस आता जवळ आला आहे. जिल्ह्याच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारी जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या, बुधवारी अत्यंत चुरशीने मतदान होत आहे. जिल्ह्यात १२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ३३ लाखांवर मतदारांच्या हाती आहे.
उद्या, बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत ३ हजार ४५२ केंद्रांवर मतदान होईल. शनिवारी (दि.२३) सकाळी आठ वाजता ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत गुलालाचे मानकरी ठरतील.
दर पाच वर्षांनी होणारी विधानसभा निवडणूक यंदा मागील अडीच वर्षांतील सत्तानाट्यामुळे अधिकच अटीतटीची व रंगतदार बनली. गेल्या पंधरा दिवसांत उडालेला प्रचाराचा धुरळा साेमवारी सायंकाळी खाली बसला. निवडणूक विभागाने पारदर्शीपणे निवडणुकीची तयारी केली आहे. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या स्ट्रॉंगरुममध्ये ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज आहेत.
- मतदान : उद्या, बुधवार २० नोव्हेंबर
- वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
- एकूण केंद्रे : ३४५२
- एकूण उमेदवार : १२१
साहित्याचे आज वाटप
मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट हा ईव्हीएम मशीनचा संच, शाई, सिलिंगचे साहित्य, वह्या, मतदार यादी, रजिस्टर अशा सर्व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. हे साहित्य घेऊन केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर राहायला जायचे आहे. फक्त महिला कर्मचाऱ्यांना सूट असून, त्या घरी जाऊ शकतात. मात्र, पहाटे त्यांनी केंद्रावर उपस्थित असले पाहिजे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉकपोल झाल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.
जिल्ह्यात १०, महिला, १० दिव्यांग केंद्रे
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे १० पिंक मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असतील. तसेच १० दिव्यांग केंद्रे आहेत. एकूण १६ हजार २३७ अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत.
- जिल्ह्यातील एकूण मतदार : ३३ लाख ०५ हजार ०९८
- पुरुष मतदार : १६ लाख ६९ हजार २७०
- महिला मतदार : १६ लाख ३५ हजार ६४२
- तृतीयपंथी : १८६
सर्वाधिक मतदार दक्षिणमध्ये
जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ७२ हजार ६८४ मतदार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहेत. सर्वात कमी मतदार कोल्हापूर उत्तरमध्ये ३ लाख १ हजार ७४३ आहेत.
चंदगड, कागल आणि कोल्हापूर उत्तरमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंग
जिल्ह्यात ३ हजार ४५२ मतदान केंद्रे असून, त्यापैकी महापालिका क्षेत्रातील सर्व व ग्रामीणमधील ५० टक्के अशारितीने २ हजार ९० मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे.
जिल्ह्यात १४३ थिमॅटिक मतदान केंद्र
मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेऊन १४३ थिमॅटिक मतदान केंद्र साकारले जाणार आहेत. कुस्तीपंढरी, प्लास्टिक बंदी, लेक वाचवा, रेशीम उद्योग, स्थानिक पर्यटन स्थळे, लोककला, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांच्या थीमवर आधारित ही केंद्रे असणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा एकूण उमेदवार
कोल्हापूर : एकूण जागा - १०
पक्ष उमेदवारांची संख्या : ५६
महाविकास आघाडी
काँग्रेस-०४
शरदचंद्र पवार पक्ष-०३
उद्धवसेना-०२
काँग्रेस पुरस्कृत : ०१
महायुती
शिंदेसेना - ०३
भाजप - ०२
अजित पवार गट - ०२
जनसुराज्य- ०४
शिंदेसेना पुरस्कृत- ०१
बहुजन समाज पक्ष : १०
वंचित बहुजन आघाडी : ०५
मनसे : ०५
राष्ट्रीय समाज पक्ष : ०३
स्वाभिमानी पक्ष : ०३
रिपब्लिकन पार्टी-ए : ०३
संभाजी ब्रिगेड पार्टी : ०२
लोकराज्य जनता पार्टी : ०१
रिपब्लिकन सेना : ०१
देशजनहित पार्टी : ०१
अपक्ष : ६५
उमेदवारांत महिला किती : ०८
सर्व दहा मतदारसंघातील एकूण उमेदवार : १२१
मावळत्या सभागृहातील बलाबल
महायुती : ०६
महाविकास आघाडी : ०४