Kolhapur: इचलकरंजीत मतदान केंद्रांवर गवा, चांद्रयानच्या प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:11 IST2024-11-20T18:10:09+5:302024-11-20T18:11:32+5:30
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानासाठी आकृष्ट करण्याबरोबर निवडणूक विभागाने चौदा मतदान केंद्रांवर विविध प्रतिकृती, रांगोळी आणि माहितीफलक लावण्याचा ...

Kolhapur: इचलकरंजीत मतदान केंद्रांवर गवा, चांद्रयानच्या प्रतिकृती
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानासाठी आकृष्ट करण्याबरोबर निवडणूक विभागाने चौदा मतदान केंद्रांवर विविध प्रतिकृती, रांगोळी आणि माहितीफलक लावण्याचा अनोखा उपक्रम इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राबविला.
मतांचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. हे करत असतानाच शहरातील काही मतदान केंद्रांवर थीमनुसार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. व्यंकटराव हायस्कूलमध्ये चांद्रयान प्रक्षेपणाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याद्वारे भारत चांद्रयान मोहिमेमध्ये अग्रेसर असल्याचे दाखविण्यात आले आहे; तर शहापूर हायस्कूलमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी गव्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
इचलकरंजी शहराला १२५ वर्षांचा यंत्रमाग व्यवसायाचा इतिहास आहे. गंगामाई विद्यामंदिरावर इचलकरंजी वस्त्रोद्योगाच्या पाऊलखुणा छायाचित्राच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या आहेत. तसेच इतिहासही लिहिण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील इतर केंद्रांवर पिंक, दिव्यांग, यूथ, मॉडेल पोलिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.
तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, घनकचरा व्यवस्थापन, हरित शहर, प्लास्टिकचा पुनर्वापर, प्लास्टिक टाळा, पर्यावरण संवर्धन, आदी संदेश विविध छायाचित्रे व प्रतिकृतींच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मतदानाला जाताना नागरिकांना या प्रतिकृती सहज नजरेला पडतील, अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.