सतेज पाटील मित्र म्हणून येतात, स्वार्थ साधल्यावर शत्रू होतात; चंद्रदीप नरकेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:11 PM2024-11-19T13:11:40+5:302024-11-19T13:12:59+5:30
कोपार्डे : दोस्तीच्या आडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या सतेज पाटील यांना मदत केलेल्या नेत्यांची ॲलर्जी होते. आपलं काम झाले की ...
कोपार्डे : दोस्तीच्या आडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या सतेज पाटील यांना मदत केलेल्या नेत्यांची ॲलर्जी होते. आपलं काम झाले की त्याचा नेमका गेम करायची त्यांची पध्दत उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण हा गेम करवीर विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्यावर उलटवून सत्तेची हाव घालवतील व माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसात वावरणाऱ्या कार्यकर्त्याला बहुमताने निवडून देतील, असा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. खुपीरे (ता. करवीर) येथील सभेत ते बोलत होते. आनंदा जगदाळे अध्यक्षस्थानी होते. सभेला मोठी गर्दी उसळली होती.
नरके म्हणाले, शिवाजी विद्यापीठ स्टुंडट कौन्सिलच्या निवडणुकीत मदतीसाठी माझ्याकडे आले आणि अध्यक्ष झाले. जिल्हा बँकेच्या १९९९ च्या निवडणुकीत गगनबावड्यातून दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील यांची मदत पाहिजे, म्हणून माझ्याकडे आले. पण, पुढे पाटील यांचा गटच हायजॅक केला. ‘गोकुळ’च्या सभेत जाण्याचे तुमचे धाडस नव्हते, आम्ही सोबत आलो नसतो तर तुमची सत्ता आली असती काय..? तुम्ही दक्षिणची काळजी करा.. ?
महादेवराव महाडिक यांची मदत घेऊन २००४ ला आमदार झाला, संजय मंडलिक यांचा वापर करून महाडिक यांचा काटा काढला. आता शाहू छत्रपतींना पुढे करून मंडलिक यांचा काटा काढलात. ‘उत्तर’च्या उमेदवारीवरून राजघराण्याचा अपमान केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सात जिल्हा परिषद सदस्य दिले. त्यावेळी पक्षश्रेष्ठींना तुम्ही दिलेला शब्द आणि शपथा आठवतात का? जे जे मदत करतात त्यांना संपविण्याचे काम सतेज पाटील करतात. पण जनता या निवडणुकीत माझ्या पाठीशी आहे. जनताच त्यांची सत्तेची हाव उतरवील, असे नरके यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले. राजवीर नरके, कुंभी संचालक संजय पाटील, तानाजी पाटील, के. डी. पाटील, आकाराम पाटील, सखाराम पाटील, संदीप पाटील, राऊ माळावले, दिनकर जांभळे, मुकुंद पाटील, एस. के. पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप शिंदे, यशोदा पाटील, निरीक्षक शारदा जाधव, शुभांगी पोवार, माधुरी पाटील, संजय सखाराम पाटील उपस्थित होते.