Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ३ आमदार, शिंदेसेनाच दमदार
By सचिन यादव | Published: November 26, 2024 04:11 PM2024-11-26T16:11:14+5:302024-11-26T16:11:47+5:30
सचिन यादव कोल्हापूर : ‘गद्दार’, म्हणून हिणवलेल्या नेत्यांना जनतेने कौल दिला असून, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिंदेसेना अधिक भक्कम झाली. ...
सचिन यादव
कोल्हापूर : ‘गद्दार’, म्हणून हिणवलेल्या नेत्यांना जनतेने कौल दिला असून, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिंदेसेना अधिक भक्कम झाली. अनेक ठिकाणी फिल्डिंग लावण्यात नेते आणि त्यांचे शिलेदार शंभर टक्के यशस्वी झाले. अडीच वर्षांत जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आमदार झाल्याने शिंदेसेनेला मोठी उभारी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली पाठराखणीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिंदेसेनेने महत्त्वाचे स्थान मिळविले. आजी-माजी आमदारांनी शिंदेसेना गल्लीबोळात पोहोचवली.
विधानसभेमुळे कार्यकर्त्यांना बूस्ट मिळाला. त्यातून येत्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारीसाठी आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू झाला. मूळचे शिवसेनेचे कोण आणि गद्दार कोण, याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. उद्धवसेना आणि शिंदेसेना, अशा दोन सेना उदयास आल्या. या सेनेचे स्वतंत्र जिल्हा, शहर प्रमुख आणि ग्रामीण जिल्हाप्रमुख बनले. निवडणुकीच्या प्रचारात एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप झाले. शिवसेनेच्या फुटीनंतर गद्दार म्हणून हिणवले गेले. मात्र, जनतेने त्यांनाच कौल दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांनी शहर आणि जिल्ह्यात प्रचार सुरू केला होता. अनेक विकासकामे, रुग्णांना मदत, दुर्मीळ आजारांवर शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत, सार्वजनिक तालीम मंडळांना सहकार्य, युवा वर्गासाठी योजना राबविल्याने शिंदेसेनेकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला.
कार्यकर्त्यांना हक्काचे नेते मिळाल्यामुळे शिंदेसेनेसाठी ही निवडणूक बळ देणारी ठरली. कोल्हापूर आणि शिवसेना हे एक वेगळे नाते आहे. प्रचाराचा नारळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोल्हापुरातूनच सुरुवात करत होते. शिवसेना पक्षाचे धोरण स्पष्टपणे मतदारांसमोर मांडत होते. एखाद्यावर टीका करतानाही सडेतोड टीका करत शिवसेना राज्यात का महत्त्वाची आहे, हे पटवून देत होते. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्यांच्या सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या या भूमिकेत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदल केल्याने मूळ शिवसैनिक हवालदिल झाले. लोकसभेप्रमाणेच विधानसभासाठी चांगली फिल्डिंग त्यांनी लावली. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर यांच्यासाठी प्रचाराच्या सभा घेतल्या. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना सुद्धा आवश्यक तेथे मदत केली. तिन्ही आमदार निवडून आल्याने शिंदेसेनेची ताकद वाढली.
शिंदेसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार बूस्टर
लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील एक तरी जागा मिळावी म्हणून भाजप हटून बसली होती. मात्र, कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागांवरचा दावा न सोडता एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात जोर लावला होता. यात कोल्हापूरची जागा शिंदेसेनेला गमवावी लागली असली तरी हातकणंगलेची जागा मात्र त्यांनी सूक्ष्म नियोजनातून मिळवत शिंदेसेनेला अधिक मजबूत बनवले. विशेष म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचा पराभव झाला असला, तरी याच मतदारसंघातील तीन जागांवर त्यांनी गुलाल घेतला आहे. करवीर व राधानगरी मतदारसंघात शिंदेसेनेचा भगवा फडकल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी शिंदेसेनेला मिळणार आहे. शिवाय, कोल्हापूर उत्तरची जागाही जिंकल्याने महापालिका निवडणुकीतही शिंदेसेनेला अधिक ताकद मिळाली आहे.
उमेदवार - मते
- प्रकाश आबिटकर - १,४४,३५९
- राजेश क्षीरसागर - १,११,०८५
- चंद्रदीप नरके - १,३४,५२८