Kolhapur North Vidhan Sabha Election 2024: राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूरचं ‘उत्तर’
By भारत चव्हाण | Published: November 24, 2024 06:33 PM2024-11-24T18:33:21+5:302024-11-24T18:33:53+5:30
२९ हजार ५६३ मतांनी विजयी : लाटकर यांचा दारुण पराभव, कोल्हापूर शिवसेनेचा बालेकिल्ला स्पष्ट
भारत चव्हाण
कोल्हापूर : टक्केवारी, गद्दारी, दादागिरी, बोका अशी गंभीर स्वरूपाची वैयक्तिक पातळीवर जहरी टीका झाल्यानंतरही त्याच्याशी आपले काही देणेघेणे नसल्याचे दाखवीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील जनतेने विकासाच्या पारड्यात मत टाकताना शिवसेनेच्या राजेश विनायकराव क्षीरसागर यांना तब्बल २९ हजार ५६३ इतक्या मताधिक्याने विजयी केले. प्रचाराच्या दरम्यान अतिशय धीराने तसेच संयमाने टीकेला सामोरे जात क्षीरसागर यांनी विरोधकांच्या टीकेला टीकेने उत्तर न देता केलेल्या विकासकामांचे कार्ड जनतेसमोर ठेवून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश भरत लाटकर यांना चारमुंड्या चित केले.
महाविकास आघाडीत ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा कोणत्या पक्षाला द्यायची, जागावाटप झाल्यानंतरही काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावर जोरदार घमासान झाले. अखेर राजेश लाटकर या अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करून महायुतीच्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात मैदानात उतरविले. त्यामुळे महायुतीचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात सरळ लढत झाली. विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच उतरून आव्हान निर्माण केलेल्या लाटकर यांनी जोरदार लढत दिली, त्यांच्यासाठी मविआच्या नेत्यांनी सर्व ताकद उभी केली. परंतु त्यांना जिंकण्यापर्यंत मजल मारता आली नाही.
शासकीय धान्य गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतपत्रिका मोजण्यात आल्या. त्यानंतर ‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली. राजेश लाटकर यांनी पहिल्या फेरीतच ७०१४ मते मिळवत क्षीरसागर यांच्यावर २४४२ इतके मताधिक्य मिळवून खाते उघडले. सहाव्या फेरीअखेर त्यांचे हे मताधिक्य साडेपाच हजारांपर्यंत पोहचले. त्यानंतर मात्र त्यांचे मताधिक्य खाली खाली घसरायला लागले. मतमोजणीच्या तेराव्या फेरीअखेर लाटकर यांचे मताधिक्य कमी होऊन राजेश क्षीरसागर यांची बॅटिंग सुरू झाली. तेराव्या फेरीपासून क्षीरसागर यांनी चढत्या क्रमाने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली, ती तेविसाव्या फेरीत विजय मिळवूनच थांबले. ईव्हीएम’वरील मतदानात क्षीरसागर यांनी शेवटच्या फेरीअखेर २९ हजार ५६३ इतके विजयी मताधिक्य मिळविले.
लाटकर यांना कसबा बावडा, लाईनबाजार, सदरबाजार, विचारेमाळ, भोसलेवाडी, जाधववाडी, शिवाजी पार्क, टाकाळा, रुईकर कॉलनी या परिसरात चांगली मते मिळाली. तर क्षीरसागर यांनी याच परिसरात अंदाजे चाळीस टक्क्यांपर्यंत मते घेतली. बाराव्या फेरीपर्यंत हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर क्षीरसागर यांचा विजय निश्चित झाला. क्षीरसागर यांना त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठेसह उत्तेश्वर, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. लाटकर यांना येथे मोठा फटका बसला.
क्षीरसागर तिसऱ्यांदा विधानसभेत
राजेश लाटकर हे तिसऱ्यांदा विधानसभेत जात आहेत. याआधी ते २००९ व २०१४ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिकची संधी होती, परंतु ऐनवेळी भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेल्या स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते समाजकार्यात सक्रिय झाले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राज्यभरात कार्याचा ठसा उमटविला.
विजयाची कारणे -
- पाच वर्षांतील जनसंपर्क
- कोल्हापूरसाठी आणलेला विकास निधी
- भाजपसह राष्ट्रवादीचेही पाठबळ, सत्यजित कदम यांची मदत
- जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेत कट्टर कार्यकर्त्यांचे विणले जाळे
पराभवाची कारणे -
- उमेदवारीचा घोळ, हात चिन्ह मिळाले नाही.
- निवडणूक तयारीचा अभाव, नवखा उमेदवार.
- महाविकास आघाडीत एकवाक्यतेचा अभाव
- मधुरिमा यांच्या माघार नाट्याने झालेली पीछेहाट
उमेदवार व त्यांचा मिळालेली मते अशी -
१. अभिजित दौलत राऊत- मनसे : २०३६
२. राजेश विनायक क्षीरसागर - शिवसेना : ११,१०८५
३. शाम भीमराव पाखरे - बसप : ५४४
४. संजय भिकाजी मागाडे - अपक्ष :१७३
५. चंद्रशेखर श्रीराम मस्के - अपक्ष : १३४
६. दिलीप जमाल मोहिते - अपक्ष : ३३८
७. राजेश भरत लाटकर -अपक्ष : ८१,५२२
८. विनय विलास शेळके - अपक्ष : २०२
९. शर्मिला शैलेश खरात - अपक्ष : २२२
१०. शिरीष रामकृष्ण पुणतांबेकर - अपक्ष : २४५
११. सदाशिव गोपाल कोकीतकर - अपक्ष : २९४
नोटा - २२७६
एकूण झालेले मतदान - १९७,६६५
हा विजय स्वाभिमानी जनतेचा असून, कोल्हापूरचे खरे उत्तर जनतेने विरोधकांना दिले आहे. जनतेने दिलेला आशीर्वाद सार्थकी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट करून विकासात मोलाचे योगदान देऊ. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे निकालाने स्पष्ट झाले. प्रचारामध्ये विरोधकांनी बदनाम करण्याचा केलेला केविलवाणा डाव जनतेने हाणून पाडला. - राजेश क्षीरसागर, विजयी उमेदवार शिवसेना
जनतेने दिलेला कौल मान्य आहे. माझी उमेदवारी उशीरा झाली. पक्षाचे चिन्ह मिळण्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे कमी वेळात एक नवीन चिन्ह घेऊन मतदारांसमोर गेलो. तरीही ८१ हजाराहून अधिक मते मिळाली. मतदारांचे आभार. पराभवाने खचून न जाता भविष्यात अधिक ताकदीने काम करणार आहे. - राजेश लाटकर, पराभूत उमेदवार