तिसऱ्या आघाडीचा निर्णय अमान्य; ‘स्वाभिमानी’त फूट, मादनाईकांसह पदाधिकाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा
By राजाराम लोंढे | Published: November 9, 2024 06:52 PM2024-11-09T18:52:19+5:302024-11-09T18:56:01+5:30
चळवळ, आंदोलनाबाबत पूर्ववतच भूमिका
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शनिवारी उभी फूट पडली. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य समन्वय समितीचे सदस्य सावकार मादनाईक यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत आतापर्यंतच्या राजकीय पीछेहाटचे चिंतन गरजेचे आहे. चळवळ व आंदोलनाबाबत आमची भूमिका पूर्ववतच राहील, असे सावकार मादनाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी तिसऱ्या परिवर्तन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना आवडला नसल्याने त्याचे पडसाद गेली महिनाभर उमटू लागले आहेत. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर इतर पदाधिकारीही अस्वस्थ होते.
‘हातकणंगले’तून उमेदवार नाकारल्यावरून जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी संघटनेला रामराम केला. आता सावकार मादनाईक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर करून राजू शेट्टी यांना हादरा दिला आहे.
या पत्रकावर सावकार मादनाईक, संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके, सतीश हेगाणा, सागर मादनाईक, संजय चौगले, विलास पाटील, पायगोंडा पाटील, रावसाहेब डोंगळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
गेल्या २५ वर्षात संघटनेतील अनेकांनी लाठ्याकाठ्या खाल्या, जेलमध्ये गेले. मात्र, राजकारणात आमची पीछेहाट झाली. याचे चिंतन व्हायला पाहिजे. राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीचा निर्णय आम्हाला अमान्य असून आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. - सावकार मादनाईक