वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:38 PM2024-11-18T13:38:42+5:302024-11-18T13:39:51+5:30
घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल
इचलकरंजी : आपले सरकार आल्यावर आम्ही वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवून वीज बिलमुक्त करणार आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न संपेल आणि आपल्या उत्पादन खर्चात कपात होईल. त्यातून वस्त्रोद्योगाला उभारी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महायुतीमधील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांची ‘विजय निर्धार सभा’ थोरात चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे. येणाऱ्या काळात त्यांच्यासाठीही सोलर योजना राबविणार आहे. तसेच घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल. इचलकरंजी शहराला आवश्यक असलेल्या पाणी योजनेत मी स्वत: पुढाकार घेऊन त्यातून योग्य मार्ग काढून शहरवासीयांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देईन. ज्यांनी आपल्याला विरोध केला, ते राम-कृष्ण म्हणत आहेत. त्यातूनच भगव्याची जादू चालू झाल्याचे दिसते. जनतेने खरे साधू कोण आहेत आणि संधीसाधू कोण आहेत, हे ओळखावे. आता आवाडे आणि हाळवणकर एकत्र आले आहेत. म्हणजे मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक होणार, असा विश्वास व्यक्त केला.
राहुल आवाडे म्हणाले, वीज सवलतीमुळे ९२ कोटी रुपये आम्हाला दिले. विकासासाठी सव्वाशे कोटी रुपये दिले. आता पुढे सुळकूड योजना आम्हाला पाहिजे. तुम्ही मदत करून त्यात पुढाकार घेतला पाहिजे.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, यंत्रमागासाठी मी जी योजना आणली त्याचा लाभ विरोध करणाऱ्या लोकांनीही घेतला. आता विरोधक फक्त माझ्या कुटुंबाला शिव्या देत आहेत. आम्हालाही गंमतशीर बोलता येते; पण आम्ही मर्यादा पाळतोय. शिव्या घालून विकास होत नाही.
सुरेश हाळवणकर, अनिल डाळ्या, मिश्रीलाल जाजू, बाळ महाराज, अशोक स्वामी यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, रवींद्र माने, अमृत भोसले, स्वप्निल आवाडे, सावकार मादनाईक, आदी उपस्थित होते.
मराठा समाजाचा पाठिंबा
शहरातील मराठा समाजाने राहुल आवाडे यांना पाठिंबा दिला. त्यासंदर्भातील पत्रही त्यांनी फडणवीस यांना दिले. याचा राहुल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
लाव रे तो व्हिडीओ
फडणवीस यांचे भाषण सुरू असताना त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवून सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ लावण्याचे आवाहन केले. तो व्हिडीओ संपल्यानंतर या समाजाने महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे पत्र दिले. त्याला त्यांनी मान्यता दिली, याचा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. तसेच यांना रोखण्यासाठी मताचे धर्मयुद्ध करावे लागेल; अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगितले.
मतांचा पाऊस
आम्हाला काही लोक सांगतात, पावसात भिजलो की, आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो की, निवडून येण्याकरिता मतांचा पाऊस लागतो. येथे कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तर मला लोकच लोक दिसत आहेत. सर्वांत जास्त लाडक्या बहिणी दिसत आहेत. या मतांचा पाऊस पडणार.