महायुतीचे डबल इंजिन सरकार नुसतंच धूर फेकतंय, सचिन पायलट यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:30 PM2024-11-18T13:30:40+5:302024-11-18T13:31:54+5:30
कोल्हापूरच्या जनतेने केव्हाच तुमचा भांग विस्कटला, सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
कोल्हापूर : ‘राज्यातील डबल इंजिनचं सरकार नुसतंच धूर फेकत आहे, जनतेसाठी काही करत नाही, अशी टीका करतानाच स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा’, असे आवाहन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी रात्री येथे कसबा बावडा येथील प्रचार सभेत बोलताना केले.
कोल्हापूर उत्तरमधील मविआ पुरस्कृत राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायदे याद्वारे मोदी सरकारने केवळ जनतेची पिळवणूक तसेच हैराण केल्याचा आरोप पायलट यांनी केला.
जनतेच्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही, निवडणुका आल्या की फक्त धर्माच्या नावावर हिंदू, मुस्लीम समाजात फुट पाडण्याचा उद्योग केला जातो. किती वर्षे तुम्ही धर्माच्या नावावर मते मागणार असा सवाल करून, पायलट यांनी मोदी सरकार व राज्य सरकारच्या भ्रष्टाचारावर प्रहार केले. केवळ सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता घ्यायचे काम भाजप करत आहे. जो आपल्या विरोधात बोलतो, त्याचे तोंड दाबण्याचे काम ईडी, सीबीआयच्या माध्यमातून केले जात आहे. जो आपल्या सोबत येतो, त्याला गंगेत साफ करून घेतले जात आहे. परंतु त्यांचे सगळे प्रयत्न फसले आहेत. महाराष्ट्रातील या निवडणुकीनंतर देशातील राजकारण बदलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कसबा बावड्याने मला जेवढे मताधिक्य दिले, त्याच्यापेक्षा जास्त मतदान राजेश लाटकर यांना द्या, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी यावेळी केले. या सभेत मोहन सालपे, राहुल आळवेकर, भारती पोवार, प्रशांत पाटील, मेघा माळी, राहुल माळी, अक्षय खोत, हर्षल सुर्वे, सुधीर पोवार, विलास दाभोलकर, आनंदा करपे, दीपक क्षीरसागर, सतीषचंद्र कांबळे, आर. के. पोवार यांची भाषणे झाली.
तुमचं सगळंच विस्कटलंय : महाडिकांना टोला
योगी आदित्यनाथ यांच्या सभेतील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘माझा कोणी भांगही विस्कटू शकत नाही’ या वक्तव्याचा संदर्भ देत आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी पराभूत करून कोल्हापूरच्या जनतेने केव्हाच तुमचा भांग विस्कटला आहे. तुमचं जे काही विस्कटायचे होतं ते सगळं विस्कटलेले आहे. हे कोल्हापूर आहे. तुम्ही बाहेरून आलाय, कितीबी येऊ द्या, कसंबी येऊ द्या. ही धमकीची, अरेरावीची भाषा कोल्हापूर खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार पाटील यांनी देताच सभेत त्याला शिट्या-टाळ्यांनी जोरदार प्रतिसाद मिळाला..
गाव माझं आहे, हिंमत असेल तर या
आजच्या सभेला प्रशासनाने विरोध केल्याचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी भाषणात दिला. ‘हे गाव माझं आहे. या गावाने मला मोठं केलं आहे. जर हिंमत असेल तर सभा थांबवायला या, असे आव्हान दिले. माझ्या प्रत्येक टप्प्यावर काटे पेरण्याचा प्रयत्न होत आहे. मला घेरण्याचे काम सुरू आहे. परंतु, माझ्या रक्तातील अंश या गावचा असल्याने असल्या विरोधाला मी घाबरत नाही’, असा इशाराही पाटील यांनी दिला.