Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:16 PM2024-11-11T16:16:46+5:302024-11-11T16:17:16+5:30

निलंबन निवडणुकीपुरतेच

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The number of insurgents increased in the assembly elections as the fear of the leadership ended | Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांत बंडखोरांमुळे अनेकांची कोंडी झाली आहे. नेतृत्वाचा धाक संपल्याने बंडोबांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच बंडखोर सुसाट सुटले आहेत आणि राजकीय पक्ष सुस्त दिसत आहेत. त्यातही या मंडळीसमोर एक-दोन नव्हे सहा सक्षम व इतर डझनभर पक्षांचा पर्याय असल्याने ते राजकीय परिणामाची पर्वा करत नाहीत.

यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढली आहे. ‘कोल्हापूर उत्तर ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ येथे, तर राजकीय पक्षांसमोर बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये बंडखोरासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागली.

‘राधानगरी’त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले आहे. ‘चंदगड’मध्ये कॉंग्रेसचे अप्पी पाटील, भाजपचे शिवाजी पाटील यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहे. येथे अपक्ष कोणाचा गेम करणार? याविषयी उत्सुकता आहे.

‘इचलकरंजी’मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी महायुतीविरोधात मैदानात उडी घेतली आहे. ‘हातकणंगले’त ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंड केले. त्याशिवाय ‘हातकणंगले’मध्ये आघाडीचे डॉ. सुजीत मिणचेकर व ‘शिरोळ’ मध्ये उल्हास पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चा झेंडा हातात घेतला आहे.

यापुर्वी बंडखोरी व्हायच्या, पण त्याला मर्यादा असायच्या. त्यावेळी जेमतेम दोन किंवा तीन पक्ष होते, त्यावेळी सहा वर्षांच्या निलंबनाची भीती असायची. निलंबन म्हणजे राजकीय कारकीर्द संपुष्टात असे वाटायचे. आता, प्रमुख सहा आणि इतर डझनभर पक्ष झाल्याने येथे नाही, तर तिथे संधी मिळते, म्हणून बंडखोरही बिनधास्त आहेत.

सावकारांच्या मनात आहे तरी काय?

आमदार विनय कोरे यांना महायुतीने ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ जागा सोडली. पण, त्यांनी ‘करवीर’ व ‘चंदगड’मध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्या या राजकीय गणिताचे अनेकांना कोडे पडले असून, त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय? अशी चर्चा सुरू आहे.

निलंबन निवडणुकीपुरतेच

पक्ष विरोधी एखाद्याने काम केले, तर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची नोटीस काढली जाते. मात्र, निकाल लागल्यानंतर जेमतेम महिन्याभरातच पक्षात पुन्हा फुलांच्या पायघड्या घालून घेतले जाते. त्यामुळे धाक संपला हे जरी खरे असले, तरी आता पक्षच एवढे झालेत की, कायमस्वरूपी दारे बंद केली, तर पक्ष कसा चालणार? अशीही भीती पक्षनेतृत्वाला असते.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The number of insurgents increased in the assembly elections as the fear of the leadership ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.