पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा माज जनता उतरविणार - डॉ. प्रकाश शहापूरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:24 PM2024-11-05T14:24:51+5:302024-11-05T14:25:54+5:30
समरजीत घाटगे यांना शहापूरकर गटाचा पाठिंबा
गडहिंग्लज : निवडणुका आल्या की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माणसे विकत घ्यायची सवय झालेली आहे. त्यांच्या पैशांना माझ्यासह एकही माझा कार्यकर्ता कधीही बळी पडलेला नाही, मिंधा नाही. जिल्ह्यातील प्रत्येक कामात ते स्वतःच्या सोयीने काम करत आहेत. त्यांची बेताल वक्तव्ये अशोभनीय असून, त्यांना पराकोटीचा सत्तेचा माज आलेला आहे. हा माज विधानसभेच्या निवडणुकीत जनता नक्की उतरविणार, असा विश्वास गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी व्यक्त केला.
कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील भावेश्वरी संकुलमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजीत घाटगे यांना डॉ. शहापूरकर गटाने पाठिंबा दिला. शहापूरकर म्हणाले पालकमंत्र्यांचे सात हजार कोटींच्या विकासकामांचे ढोल म्हणजे जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळफेक आहे. गोड साखर कारखान्यातील हस्तक्षेपाबद्दल त्यांना पळता भुई देखील थोडी होईल इतके पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
घाटगे म्हणाले, जनतेने ज्यांना पंधरा वर्षे सत्ता दिली, त्यांनी येथील घराघरांमध्ये केवळ भांडणे लावूनच सत्ता भोगली. आम्ही मंजूर करून आणलेले कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करण्याचे पाप पालकमंत्र्यांनी केले. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.
शिवाजी खोत यांनी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेच्या घरादारावर नांगर फिरवल्याचा आरोप केला. यावेळी शिवानंद माळी, ॲड. दिग्विजय कुराडे, सुरेश कुराडे, पवन इंचनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोड साखरच्या संचालिका कविता पाटील, प्रकाश पाटील,आनंद कुलकर्णी, बचाराम मोहिते, डॉ.अनिल कुराडे यांच्यासह कौलगे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी,महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोंडिबा पवार यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव डोंगरे यांनी आभार मानले.