आम्हाला मतदानाला या, असं कोण म्हणालंच नाही; ऊसतोड मजुरांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 04:17 PM2024-11-21T16:17:45+5:302024-11-21T16:19:18+5:30
आयुब मुल्ला खोची: लोकशाहीतील मतदानाचा दिवस हा उत्सव म्हणून मोठ्या ईर्षेने जिद्दीने हातकणंगले तालुक्यात साजरा केला गेला. तर दुसरीकडे ...
आयुब मुल्ला
खोची: लोकशाहीतील मतदानाचा दिवस हा उत्सव म्हणून मोठ्या ईर्षेने जिद्दीने हातकणंगले तालुक्यात साजरा केला गेला. तर दुसरीकडे बीड,नाशिक,जालना या जिल्ह्यातून ऊस तोडीसाठी आलेले ऊसतोड मजूर मात्र मतदानापासून वंचित राहत आपल्याच कामात मग असल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले.
आम्हाला कोणी बोलावलं नाही..साधा फोन सुद्धा केला नाही.. जर उमेदवारांनाच गरज नसेल.. तर आम्ही कशाला मतदान करायचे... अशा प्रतिक्रिया या ऊसतोडमजूर मतदारांनी व्यक्त केल्या. निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे परंतु हेच प्रयत्न मात्र या ऊसतोड मजुरापर्यंत पोहोचले नसल्याचे हे चित्र पाहावयास मिळाले. नरंदे परिसरात शेकडो ऊसतोड मजुरांची कुटुंबे मतदान करण्यापासून वंचित राहिली.
तालुक्यात आज सकाळपासूनच मतदानाची धांदल उडाली होती. नरंदे ,बुवाचे वठार, खोची, सावर्डे, कुंभोज या परिसरातून मतदारांना नेण्या आणण्यासाठी गाड्या खचाखच भरून जात होत्या. मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. लोकशाहीतील महत्त्वपूर्ण असा मतदानाचा हक्क बजावण्याचा अभिमान चेहऱ्यावर दिसत होता. या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या रस्त्याच्या बाजूलाच निवाऱ्यासाठी खोपट मारत तर काहीजण जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करत आपल्याच कामात मग असणारे शेतमजूर दिसत होते.
त्यांना परिसरातील गावात मतदानासाठी लोक गाड्यातून जात आहेत आणि आपण मतदान करण्यापासून वंचित राहिलो आहे याची जाणीव होत होती.परंतु आपणास मतदानाला या असे कोण म्हणालेच नाही याची खंत मात्र वाटत होती.ना पुढारी..ना निवडणूक यंत्रणा.. यातील कोणीच संपर्क केला नाही ही खरी असंवेदिनशीलता म्हणावी लागेल.
आम्ही दोन दिवसापूर्वी ऊस तोडणी साठी गाव सोडून बाहेर पडलो.ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये साहित्य भरून पोरा बाळासह आलो.परंतु तुम्ही मतदान करून दोन दिवसांनी जावा असे कोणी ही म्हटले नाही.इथे पोहचल्यावर पण ना फोन केला ना वाहन पाठविले.त्यामुळे आम्ही मतदान करू शकलो नाही.- अशोक वायभसे,बीड जिल्हा)
पैशाची उचल आहे.जास्तीत जास्त काम करून त्याची परतफेड करावीच लागेल.त्यामुळे कामाच्या ओढीने या भागात आलो आहे.आम्हाला कोण उभा याच्याशी काही मतलब नाही.ज्यांना मतदान पाहिजे ते पण आम्हाला भेटले नाही आणि बोलावले पण नाहीत.आम्ही आता येथे निवाऱ्याची सोय करीत बसलो आहे. - विनोद कांबळे केज मतदारसंघ,बीड)