पक्ष निष्ठाच गुंडाळण्याचा ट्रेड; कपडे बदलण्याइतक्या सहजपणे नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर
By भीमगोंड देसाई | Published: November 1, 2024 03:43 PM2024-11-01T15:43:02+5:302024-11-01T15:44:37+5:30
कायम सत्ता, लाभाचा अतीव मोह, खोबरे मिळेल तिकडे चांगभले
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात कपडे बदलावे इतक्या सहजपणे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पक्षांतर करीत आहेत. कायम सत्तेत आणि लाभ मिळत राहण्याच्या अतीव मोहामुळे ते खाेबरे मिळेल तिकडे चांगभले करीत आहेत. पक्षनिष्ठाच गुंडाळून ठेवून संधिसाधूपणा फोफावला आहे. नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची यामध्ये चंगळ होत असल्याने वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षात काम करणाऱ्यांच्या वाट्याला खळ, पोस्टर, जाझम, खुर्च्या उचलणेच येत आहे. यामुळे नव्याने राजकारणात येण्याचा विचार करीत असलेले तरूण, तरूणींमध्ये नकारात्मकता अधिक गडद होताना दिसत आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आमदार उघडपणे फुटून गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत फुटून जाण्याच्या प्रवृत्तीला मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. तरीही आताच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय करिअर स्थिरस्थावर असलेलेही तिकीट मिळाले नाही, खोके पोहोच झाले, भविष्यात लाभाचे आश्वासन मिळाल्यानंतर मूळ पक्ष सोडून जात आहेत. विशेष म्हणजे विरूध्द आणि टोकाची भिन्नता असलेल्या विचारसरणीच्या पक्षात जाऊन निवडणूक रिंगणात आहेत. यावरून मी म्हणजेच पक्ष, मतदारांनी माझ्या मागेच फरपटत आले पाहिजे, मी सांगेल त्याप्रमाणेच करावे, अशी त्यांची छुपी भूमिकाही यानिमित्ताने उघड झाली आहे.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पोवार, शेकापचे बाबुराव कदम यासह काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे उभे आयुष्य गेले. वर्षानुवर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता ते काम करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत विविध आलेल्या ऑफर्स धुडकावून ते पक्षनिष्ठेशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. सध्याचे चित्र याउलट आहे. उमेदवारी देताना निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात ताकदवान असणाऱ्यांचा विचार प्राधान्याने होत आहे. यामुळेच निष्ठेचाच सौदा सुरू आहे.
राजकारणात धंदेवाईकांचा भरणा
धंदेवाईकांचा राजकारणात अधिक भरणा झाल्याने राजकारणाचा धंदा आणि व्यवसाय झाला आहे. केवळ मते मिळण्यासाठी मी समाजसेवक आहे, अशा फुशारक्या मारल्या जातात. प्रत्यक्षात व्यवहार उलटा असतो. विचारांचा व्यवहार सोडून व्यवहारांचा विचार वाढल्याने ज्या पक्षाने आमदार, खासदार, मंत्री केले तेही सहजपणे संधिसाधू भूमिका घेत आहेत.