शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:59 PM2024-11-06T13:59:01+5:302024-11-06T13:59:54+5:30

समीर देशपांडे कोल्हापूर : निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There will be confusion of names and symbols in four constituencies in Kolhapur district | शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

समीर देशपांडे

कोल्हापूर : निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं लागतं. पदं द्यावी लागतात; परंतु याही पुढे जाऊ ‘साम, दाम, दंड, भेद’ वापरताना काही तंत्रेही अवगत करावी लागतात. यातील एक म्हणजे रिंगणात एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करणे, त्यांच्या चिन्हांमुळे गोंधळ होऊन मतविभागणी व्हावी, यादृष्टीनेही जोडण्या घालाव्या लागतात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, हातकणंगले आणि इचलकरंजी येथे हा खेळ करण्यात आला आहे.

शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रकार झाला आहे. या ठिकाणी उद्धवसेनेचे सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरूडकर हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचे चिन्ह मशाल आहे. परंतु त्यांच्याव्यतिरिक्त सत्यजित बाळासाहेब पाटील (आबा), (अपक्ष) चिन्ह चिमणी आणि सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष), चिन्ह गळ्याची टाय असे आणखी दोन सत्यजित पाटील रिंगणात मुद्दाम उतरवण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूनेही ही खेळी खेळण्यात आली आहे. डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जनसुराज्य शक्ती) चिन्ह नारळाची बाग हे अधिकृत उमेदवार असताना आणखी दोन सावकर मैदानात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये विनय वि. कोरगावकर (सावकर) (अपक्ष), चिन्ह भेंडी आणि विनय वि. चव्हाण (सावकर) (अपक्ष), चिन्ह झोपाळा हे रिंगणातील उमेदवार गोंधळ उडवणार आहेत.

राधानगरी मतदारसंघात उद्धवसेनेचे कृष्णराव परशराम ऊर्फ के. पी. पाटील (उद्धवसेना) चिन्ह मशाल हे अधिकृत उमेदवार असताना या ठिकाणी अपक्ष चिमणी चिन्ह घेऊन आणखी एक के. पी. पाटील रिंगणात उतरले आहेत. हातकणंगले मतदारसंघात आवळे राजू (बाबा) जयवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्ह हात असताना आणखी एक आवळे शिवाजी महादेव (अपक्ष), चिन्ह बॅट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जनसुराज्य शक्तीचे दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) हे नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत असताना अपक्ष अशोक तुकाराम माने यांनी झोपाळा हे चिन्ह घेऊन लढण्याचे ठरवले आहे.

इचलकरंजीमध्ये मदन सीताराम कारंडे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पाटी-शरदचंद्र पवार), चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे राहुल आवाडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असताना अपक्ष उमेदवार मदन येताळा कारंडे, अंगठी यांच्या नावामुळे संभ्रम वाढणार आहे.

चिन्हावरच द्यावा लागणार भर

मतदार मतदानाआधीच प्रक्रिया करून आता गेला की थोडा भांबावतो. यंत्रावरील मतपत्रिका पाहिली की त्याचा गोंधळ उडतो. याच मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी एकाच नावाचे, आडनावाचे उमेदवार रिंगणात उतरवणे, चिन्हांमध्ये साम्य दिसून गोंधळ होईल, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आता उमेदवारांना चिन्हावरच भर द्यावा लागणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There will be confusion of names and symbols in four constituencies in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.