Vidhan Sabha Election 2024: सभा विशाल; तरी पेटली नाही मशाल!, उद्धवसेनेवर आत्मचिंतनाची वेळ
By पोपट केशव पवार | Published: November 26, 2024 04:42 PM2024-11-26T16:42:19+5:302024-11-26T16:43:30+5:30
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही
पोपट पवार
कोल्हापूर : मराठी अस्मितेचे वारे फुलवत १९९० पासून कोल्हापूर जिल्ह्यात बाळसे धरलेल्या शिवसेनेने दहा वर्षांपूर्वी तब्बल सहा आमदार निवडून दिले. मात्र, पक्षफुटीनंतर उडालेली शकले, मूळच्या शिवसैनिकांचा कमी झालेला आत्मविश्वास अन् नेतृत्वाने घेतलेली कचखाऊ भूमिका यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. सभांची विशाल गर्दी होऊनही मशाल का पेटली नाही याचे आत्मचिंतन करण्याची वेळ उबाठा गटावर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उबाठा पक्ष राधानगरी व शाहूवाडी मतदारसंघात मैदानात उतरला होता. राधानगरीत के.पी. पाटील तर शाहूवाडीत सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या राज्यस्तरीय प्रचाराचा नारळच के.पी. यांच्या मतदारसंघातून आदमापूर येथे फोडला होता. या सभेतील उत्साह अन् गर्दीने उबाठा गटाचा आत्मविश्वास दुणावला; मात्र, या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. शाहूवाडीतही सत्यजित पाटील-सरुडकर यांना लोकसभेनंतर सलग दुसऱ्यांदा विधानसभेला पराभव पत्करावा लागला.
कोल्हापूर जिल्ह्यात १९९० मध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिल्हाभर पाय पसरले. २००९ च्या निवडणुकीत सेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. पुढे २०१४ च्या निवडणुकीत तब्बल सहा आमदारांनी भगवा फडकावत जिल्हा शिवसेनामय करून टाकला. मात्र, सर्वाधिक जागा मिळूनही मंत्रिपद न दिल्याने पक्ष विस्ताराला मर्यादा आल्या. सत्ता असूनही सत्तेची सावली न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ आली.
परिणामी, २०१९ च्या निवडणुकीत राधानगरीत प्रकाश आबिटकर यांच्या रूपात एकमेव शिवसैनिकाला विधानसभेत जाता आले. पक्षाची ही वाताहत थांबता थांबत नसताना पक्षफुटीनंतर आबिटकर यांनीही शिंदेसेनेची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे जिल्ह्यात नव्याने पक्षबांधणीचे आव्हान उभे राहिले. मात्र, नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. जे राहिले ते निष्ठावंत म्हणत त्यांनी प्रचारातही ‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ असा मुद्दा रेटला. मात्र, तो तितकासा जनतेला भावला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
जागावाटपातही माघार
२०१९ च्या निवडणुकीत ज्या जागा ज्या पक्षाने लढवल्या व जेथे कोणाचा विद्यमान आमदार असेल त्यांना त्या जागा देण्याचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला होता. उद्ववसेनेने राधानगरी, शाहूवाडी या पूर्वीच्या जागा घेतल्या. मात्र, शिरोळची जागा त्यांना काँग्रेससाठी सोडावी लागली. शिवाय, हातकणंगले, कोल्हापूर उत्तर व चंदगडमध्येही त्यांना या फॉर्म्युलाचा तोटा सहन करावा लागला. लोकसभेलाही त्यांनी हक्काची जागा काँग्रेससाठी साेडली होती.
उमेदवारांना मिळालेली मते
- के.पी. पाटील - राधानगरी - १,०५,६४२
- सत्यजित पाटील-सरुडकर - शाहूवाडी - १,००,०११