Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात कडकडीत ‘बंद’, वीरमातांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:16 PM2018-08-09T13:16:58+5:302018-08-09T13:45:38+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या आंदोलनाचा कोल्हापूरातील हा अठरावा दिवस होता.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या आंदोलनाचा कोल्हापूरातील हा अठरावा दिवस होता.
मराठा समाजासाठी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, अशा ठाम निर्धाराने सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने दि. २४ जुलैपासून कोल्हापुरातील दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी दसरा चौकात गावोगावचे मराठा तरुणांचे जत्थे ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत, हातात भगवे झेंडे घेवून दुचाकीवरून सकाळी नऊ वाजल्यापासून येवू लागले.
तासाभरातच हा परिसर गर्दीने फुलला. तरूणांसह महिला, आबालवृद्ध हे दसरा चौकात जमले होते. सकाळी अकरा वाजता दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याखाली पाच वीरमाता आणि वीरपत्नींच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत, मराठा आरक्षण गीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला.
अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. या सभेमध्ये महापौर शोभा बोंद्रे, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी उपमहापौर महेश सावंत, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांच्यासह सर्वच नगरसेवक दसरा चौकात उपस्थित होते. गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक येथे उपस्थित होते. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक डॉ. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकात तैनात होते. आंदोलकांसाठी मुस्लिम बोर्र्डिगच्यावतीने मसाला दूधचे वाटप करण्यात आले.
रस्त्यावर तीन हजार पोलीस
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी म्हणून पहाटेपासून तीन हजार पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत.
शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहनांची बॉम्बशोध पथकाद्वारे तपासणी करण्यात आले असून पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाक्यांसह चौका-चौकांत बॅरिकेड लाउन कडक नाकाबंदी करण्यात येत होती. याशिवाय वाहनांचीही कसून तपासणी सुरू होती.
दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे
शहरात १५० पेक्षाजास्त सीसीटीव्ही कॅमेरे विविध चौकांत बसविले आहेत. पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये एक विशेष पथक शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
इंटरनेट सेवा बंद
या बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे व्हॉट्स अॅप, फेसबुक, आदी सोशल मीडियावरील संदेश पाठविण्यात येत नव्हते.
एस.टी., केएमटी राहिली बंद
‘बंद’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील एस. टी. आणि शहरातील के.एम.टी.ची सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज, गुरुवारी सकाळपासून एकही एस.टी. स्थानकातून बाहेर पडली नाही. रिक्षा देखील फिरत नव्हत्या. याशिवाय शहरातील सर्व चित्रपटगृहेही बंद होते तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयेही बंद होते.
घोषणा, भिरभिरते झेंडे
कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरील शाहू नाका, महाराणी ताराराणी चौकातून तरूणांचे जथ्थे हे दुचाकीवरून हातात भिरभिरते भगवे झेंडे आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा देत ते दसरा चौकात येत होते.